• Mon. Apr 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

धक्कादायक! गेमच्या व्यसनासाठी ६५ वर्षीय आजींचा हार लांबवला; १५ वर्षीय बालक पोलिसांच्या जाळ्यात

ByEditor

Apr 27, 2026

अलिबाग | सागर पेरेकर
अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे परिसरात घडलेल्या एका खळबळजनक चैन स्नॅचिंग प्रकरणाचा छडा लावण्यात पोयनाड पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात एका १५ वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ऑनलाईन गेमच्या व्यसनासाठी लागणाऱ्या पैशांची पूर्तता करण्यासाठी ही चोरी केल्याची धक्कादायक कबुली या मुलाने दिली आहे.

​१९ एप्रिल रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास, ६५ वर्षीय आशा पाटील या आपल्या घराच्या आवारात फुले तोडत होत्या. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना पाठीमागून ओढून, त्यांच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीचा सोन्याचा लक्ष्मी हार जबरदस्तीने हिसकावून नेला होता. या प्रकरणी त्याच रात्री पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित अल्पवयीन मुलाचा शोध घेतला. संशयिताला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मोबाईलवरील ‘ऑनलाईन गेम’च्या व्यसनामुळे त्याला पैशांची मोठी गरज भासत होती आणि त्यातूनच त्याने हा टोकाचा मार्ग पत्करल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या मुलाकडून ७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार जप्त केला आहे.

​या घटनेमुळे ऑनलाईन गेमिंगचे मुलांवरील वाढते दुष्परिणाम पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. “लहान मुलांच्या हातात मोबाईल देताना आणि त्यांच्या वागणुकीवर पालकांनी बारकाईने लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे,” असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!