रायगड | अमुलकुमार जैन
जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) माणगाव येथे कार्यरत असलेल्या सहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याने संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. निलंबितांमध्ये उपनिरीक्षक अविनाश पाटील यांच्यासह बाबासो पिंगळे, वाघमोडे, सोंडकर, पहलकर आणि आंबले या सहा जणांचा समावेश आहे.
माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद कंपनीतून माल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात काही मुद्देमाल माणगाव पोलिसांनी हस्तगत केला होता. मात्र, त्या मुद्देमालाची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची गंभीर विसंगती उघडकीस आली. ही बाब पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कठोर पाऊल उचलत संबंधित सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, या कारवाईनंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, विविध चर्चांना उधाण आले आहे. बदलीनंतरही काही कर्मचारी हस्तकांच्या माध्यमातून बेकायदेशीर वसुली करत असल्याच्या तसेच एका कर्मचाऱ्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात मालमत्ता असल्याच्या चर्चाही जोर धरू लागल्या आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, आता सखोल चौकशीद्वारे सत्य परिस्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची बारकाईने तपासणी सुरू असून, दोषींवर आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
