धाटाव । शशिकांत मोरे
राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून सुरू असलेला बेमुदत संप आज चौथ्या दिवसापर्यंत सुरू आहे सुरू असलेला संप अधिक तीव्र होत असून, रोहा तालुक्यात त्याचे पडसाद स्पष्टपणे उमटत आहेत. विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघटनांनी संप पुकारल्याने शासकीय कार्यालयांतील कामकाज मोठ्या प्रमाणात ठप्प झाले आहे.
या संपामुळे उत्पन्न, जात तसेच इतर आवश्यक दाखले वेळेवर न मिळाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यातही अडथळे निर्माण झाले असून, सर्वसामान्य नागरिकांवर त्याचा थेट परिणाम होत आहे.
दरम्यान,या आंदोलनात मध्यवर्ती संघटनेचे रोहा तालुका अध्यक्ष गणेश लोंढे, जिल्हा खजिनदार वृषाली निंबरे, उपविभागीय अध्यक्ष अमर ठमके तसेच तालुका अध्यक्ष संदीप पडघे या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संपाबाबत असलेली आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. उपविभागीय अध्यक्ष अमर ठमके यांनी म्हटले की, “चर्चेतून तोडगा निघाला नाही तर आंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल”.एकंदरीत,सुरू असलेल्या या संपामुळे प्रशासनावर ताण निर्माण झाला असून,परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
