• Fri. Apr 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विकासकामांचा दर्जा आणि गती समाधानकारक; श्रीवर्धन तालुक्यात प्रगतीचा आढावा घेत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले समाधान

ByEditor

Apr 24, 2026

श्रीवर्धन | अनिकेत मोहित
श्रीवर्धन मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी आज श्रीवर्धन शहर व तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा मॅरेथॉन पाहणी दौरा करून प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी ऐतिहासिक स्मारकांपासून ते जनहितार्थ प्रकल्पांपर्यंत सर्व कामांची बारकाईने पाहणी केली. तसेच, उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस मशीनचे लोकार्पण करत आरोग्य सेवेत मोठी भर घातली.

या दौऱ्यादरम्यान खासदार तटकरे यांनी भुवनाले तलाव, समुद्रकिनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधारा, छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘शिवसृष्टी’ स्मारक आणि पेशवे स्मारक या महत्त्वाच्या प्रकल्पांना भेटी दिल्या. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती घेत असतानाच, त्यांनी कामाचा दर्जा आणि गतीबद्दल समाधान व्यक्त केले. पर्यटनाच्या आणि ऐतिहासिक वारशाच्या दृष्टीने हे सर्व प्रकल्प श्रीवर्धनसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

याच दौऱ्यात श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात नव्याने बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक डायलिसिस मशीनचे लोकार्पण खासदार तटकरे यांच्या हस्ते पार पडले. या सुविधेमुळे तालुक्यातील गरजू रुग्णांना आता स्थानिक पातळीवरच उपचार उपलब्ध होणार असून, त्यांना मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

श्रीवर्धन तालुक्याच्या विकासाचा वेग भविष्यातही कायम राखण्याचा निर्धार व्यक्त करताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, “तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करून जनतेला समर्पित करणे हे आमचे प्राधान्य आहे.”

या पाहणी दौऱ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध विभागांचे शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दौऱ्यामुळे विकासकामांना अधिक वेग मिळण्याची चिन्हे असून तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!