उरण | अनंत नारंगीकर
खोपटा पुलावर शुक्रवारी सकाळी मालाची वाहतूक करणारा एक अवजड कंटेनर पलटी झाल्याची थरारक घटना घडली. या अपघातातून समोरून जाणारे दुचाकीस्वार सुदैवाने थोडक्यात बचावले असून मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, या अपघातामुळे उरण आणि जेएनपीए मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २४) सकाळी ८ च्या सुमारास हा कंटेनर खोपटा-कोप्रोली येथून माल भरून जेएनपीए बंदराच्या दिशेने निघाला होता. खोपटा पुलावर चढत असताना, समोरून येणाऱ्या एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने कंटेनर डाव्या बाजूला वळवला. मात्र, उतारावर ताबा सुटल्याने हा अवजड कंटेनर रस्त्याच्या कडेला उलटला.
वाहतुकीचा खोळंबा
हा अपघात वर्दळीच्या वेळी झाल्याने उरण आणि जेएनपीएकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला सारून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. काही तासांच्या प्रयत्नानंतर या मार्गावरील वाहतूक संथ गतीने पूर्वपदावर आली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, खोपटा पुलावरील वाढत्या जड वाहतुकीमुळे अपघातांचा धोका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
