• Fri. Apr 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोह्यात राष्ट्रवादीला ‘दे धक्का’; अनेक कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

ByEditor

Apr 24, 2026

​अशोक धोत्रेंच्या नेतृत्वावर मोहोर; आ. महेंद्र दळवींच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन

​धाटाव | शशिकांत मोरे
रोहा अष्टमी नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) नेते अशोक धोत्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा सुरुंग लावत खालचा मोहल्ला भागातील असंख्य तरुण आणि महिला कार्यकर्त्यांना शिवसेनेत सामील करून घेतले आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून, यामुळे रोह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

​धोत्रेंच्या नेतृत्वाला पसंती

काही काळापूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या अशोक धोत्रे यांनी नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत केवळ दहा दिवसांच्या प्रचारात राष्ट्रवादीला जेरीस आणले होते. त्यांच्या याच आक्रमक कार्यशैलीवर विश्वास ठेवून आता मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेना प्रवेश केला आहे. यामध्ये रम्मक शेटे, अनिफ पठाण, मजेदार किडमगैर, फैजल सिद्दिक, असिद पेडेकर, बाबाजाम शेटे, अस्सलम खान, लाला शेख, सफा शेटे, शगुफ्ता जेगा, नोमरान, खतिजा रोगे, राकेश शेडगे यांसह अनेक समर्थकांचा समावेश आहे.

​’ये तो झांकी है…’

​पक्षप्रवेशावेळी बोलताना अशोक धोत्रे यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. “ये तो झांकी है, और प्रवेश बाकी है,” असे म्हणत त्यांनी लवकरच रोहा शहरात मोठा जाहीर प्रवेश सोहळा आयोजित करणार असल्याचे जाहीर केले. तसेच, न्यायालयीन लढाईत आमचाच विजय होईल आणि विरोधकांचा बनाव लवकरच उघड पडेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

​राजकीय संघर्षाची नांदी

आगामी ग्रामपंचायत आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने रोह्यात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्या रोहा शिवसेनेत तालुकाप्रमुख किंवा शहरप्रमुख ही पदे रिक्त असली, तरी अशोक धोत्रे यांच्याकडे लवकरच स्थानिक नेतृत्वाची मोठी जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत मिळत आहेत.

​आमदार महेंद्र दळवी यांनी नूतन कार्यकर्त्यांचे स्वागत करताना म्हटले की, “अशोक धोत्रे यांच्या पाठीशी शिवसेनेची ताकद खंबीरपणे उभी असून, नवीन कार्यकर्त्यांमुळे पक्ष अधिक मजबूत होईल. प्रत्येकाचा योग्य सन्मान राखला जाईल.”
​राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात लागलेल्या या धक्क्यामुळे आता आगामी काळात शिंदे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट आणि संघर्षमय सामना रोह्यात पाहायला मिळणार, हे निश्चित झाले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!