पोलादपूर: महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात गुरुवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात वाईतील दांपत्याचा ७०० फूट खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. मोहन चव्हाण (वय ५५) आणि राजश्री चव्हाण (वय ४८, रा. सोनगिरवाडी, ता. वाई) अशी मृतांची नावे आहेत. कुंभरोशी गावाजवळ एका धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आंबेनळी घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण दांपत्य आपल्या दुचाकीवरून (एम.एच. ११ सी.एल. ८२८७) प्रतापगडच्या दिशेने जात होते. घाटातील तीव्र उताराच्या एका वळणावर दुचाकी संरक्षक कठड्याला धडकली आणि थेट दरीत कोसळली. विशेष म्हणजे, दुचाकी बॅरिकेट्समध्येच अडकून पडली होती, मात्र वेगामुळे दांपत्य दरीत फेकले गेले. प्रतापगड रेस्क्यू टीमचे सदस्य अमित जाधव हे त्या मार्गावरून जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला दुचाकी संशयास्पदरीत्या उभी असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलादपूर आणि महाबळेश्वर पोलिसांनी बचाव पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अवकाळी पाऊस, दाट धुके आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मदतकार्यात मोठे अडथळे आले. रात्रीच्या अंधारात रोपच्या साह्याने रेस्क्यू टीम दरीत उतरली असता त्यांना ७०० ते ९०० फूट खोलीवर दोन मृतदेह आढळून आले. पावसाचा जोर आणि विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांच्या धोक्यामुळे गुरुवारी रात्री दीड वाजता शोधमोहीम थांबवावी लागली. शुक्रवारी सकाळी पुन्हा मोहीम राबवून पुरुषाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले, तर महिलेचा मृतदेह शनिवारी बाहेर काढला जाणार आहे.
पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी सांगितले की, घाटातील तीव्र उतार आणि पावसाळ्यासारख्या वातावरणामुळे दृश्यमानता कमी झाली होती, ज्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नसावा. आंबेनळी घाटात यापूर्वीही अनेक भीषण अपघात झाले आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये एका कारचा अपघात होऊन आठ जण जखमी झाले होते. प्रशासनाकडून या मार्गावर सतत सतर्क राहण्याचे आवाहन केले जात असले, तरी धोकादायक वळणांवर होणारे मृत्यू सत्र थांबता थांबत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
