माणगाव पोलीस आणि महिला-बालविकास विभागाची संयुक्त कारवाई; पालकांचे केले समुपदेशन
रायगड । सागर पेरेकर
माणगाव तालुक्यातील कातेचीवाडी येथे दोन बहिणींच्या विवाहाची लगबग सुरू असतानाच, त्यापैकी एक मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली. माणगाव पोलिसांनी तत्परता दाखवत महिला व बालविकास विभागाच्या मदतीने हा बालविवाह वेळेत रोखला. प्रशासनाच्या या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीचे भवितव्य सुरक्षित झाले असून संपूर्ण तालुक्यात या कारवाईची चर्चा आहे.
कातेचीवाडी येथील एका कुटुंबात दोन बहिणींचा विवाह एकाच वेळी नियोजित होता. मात्र, त्यातील एक मुलगी १८ वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याची गोपनीय माहिती माणगाव पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस ठाण्याचे पथक आणि महिला व बालविकास विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलीच्या वयाची कागदपत्रे तपासली असता ती अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.
यावेळी पोलिसांनी पालकांशी सविस्तर संवाद साधला. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार बालविवाह करणे हा दखलपात्र गुन्हा असून, त्याचे गंभीर कायदेशीर परिणाम पालकांना समजावून सांगण्यात आले. केवळ कायदाच नव्हे, तर कमी वयात लग्न केल्यामुळे मुलीच्या आरोग्यावर, शिक्षणावर आणि मानसिकतेवर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीवही करून दिली. प्रशासनाच्या या प्रभावी समुपदेशनानंतर पालकांनी आपली चूक मान्य केली आणि तातडीने हा विवाह थांबवण्याचा निर्णय घेतला.
वेळेत केलेल्या या कारवाईमुळे एका मुलीचे आयुष्य सुरक्षित झाले आहे. “बालविवाह ही एक अनिष्ट प्रथा असून ती रोखणे ही समाजाची जबाबदारी आहे. नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी, जेणेकरून कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही,” असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या मोहिमेत माणगाव पोलीस पथक आणि महिला व बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
