खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सोहळा; सरपंच उमेश पवारांना विकासाची खात्री
म्हसळा । वैभव कळस
तालुक्यातील महत्त्वपूर्ण आणि मोठ्या लोकवस्तीची ‘ग्रुप ग्रामपंचायत केल्टे’ येथील सरपंच, सदस्य आणि महिला मंडळाने आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. रोहा येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी बोलताना सरपंच उमेश पवार यांनी पक्षप्रवेशाचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की, “गावाचा सर्वांगीण विकास केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करू शकतो. पक्षाचे धोरण आणि खंबीर नेतृत्व हे गावाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. आतापर्यंत खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून गावात अनेक मोठी विकासकामे मार्गी लागली आहेत. उर्वरित कामेही याच नेतृत्वाखाली पूर्ण होतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
या सोहळ्यात गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. यात प्रामुख्याने सरपंच उमेश पवार, उपाध्यक्ष किसन पवार, खजिनदार प्रकाश पवार, गावपाटील शंकर पवार, माजी सदस्य रमेश कासरुंग, अनंता कोबनाक, गणपत कासरुंग, शंकर कोबनाक, गणेश सावंत, सहदेव चव्हाण, सहदेव कासरुंग, पांडुरंग बोर्ले, रविंद्र कासरुंग, कौशल्य सावंत, अपर्णा जावळेकर, संजना पवार, शिल्पा चव्हाण, सीमा शिगवण, भाविका शिगवण, अरुणा रटाटे, कल्पना पवार, रोहिणी शिगवण, प्रणाली जावळेकर, सुचमिता आंबेकर, प्रियंका कासरुंग यांचा समावेश होता.
खासदार सुनील तटकरे यांनी सर्व नूतन सदस्यांचे पक्षात स्वागत करून, केल्टे गावाच्या विकासासाठी पक्ष सदैव खंबीरपणे पाठीशी राहील, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
