• Thu. Apr 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

संपाचा आरोग्य सेवेला मोठा फटका; अलिबाग जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल

ByEditor

Apr 23, 2026

रुग्णांच्या वेदनांकडे अधिपरिचारिकांचे दुर्लक्ष? तातडीच्या शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्याने तणाव

अलिबाग | सागर पेरेकर
राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपात नर्सेस फेडरेशन सहभागी झाल्यामुळे अलिबाग जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. २१ एप्रिलपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या दररोजच्या २५० ते ३०० रुग्णांना भीषण अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिचारिका अभावी अनेक तातडीच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्तव्यावर प्रश्नचिन्ह: रुग्णालय परिसरात तणाव

संपाच्या काळात काही अधिपरिचारिका आणि अधिपरिचालक रुग्णालय परिसरातच उपस्थित असूनही ते रुग्णांना साधी मदतही करत नसल्याचा आरोप नातेवाईकांकडून होत आहे. डोळ्यादेखत रुग्णांची होणारी गैरसोय पाहूनही केवळ संपाचे कारण पुढे करत मदतीसाठी नकार दिला जात असल्याने, त्यांच्या व्यावसायिक नैतिकतेवर आणि कर्तव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनासमोर पेच निर्माण झाला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

शेकाप महिला आघाडीचा आक्रमक पवित्रा

रुग्णांच्या वाढत्या हालचालींची दखल घेत शेकाप महिला आघाडीच्या राज्य प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. “आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा असून ती कोणत्याही परिस्थितीत खंडित होता कामा नये. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रुग्णांना दिलासा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.

प्रशासनाकडे प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा

निवेदनाद्वारे केवळ संप मिटवण्याचीच नाही, तर रुग्णालयातील इतर समस्यांकडेही लक्ष वेधण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या सहा महिन्यांच्या फिरत्या बदल्यांचे धोरण राबवावे, रुग्णालयातील बंद असलेली शौचालये तातडीने दुरुस्त करून सुरू करावीत अशा सुधारणा उपायांची मागणी करण्यात आली.

यावेळी सुरेश घरत, सागर पेरेकर, धुमाळ यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य सेवा कधी पूर्ववत होते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!