• Thu. Apr 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिवंगत शिक्षण सेवकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २५ एप्रिलला रोह्यात ‘कॅन्डल मार्च’

ByEditor

Apr 23, 2026

रायगड जिल्ह्यातील २०० हून अधिक शिक्षण सेवकांचा सहभाग; मौन मोर्चाद्वारे भावनांना देणार वाट

कोलाड | विश्वास निकम
सन २०२४ च्या शिक्षक भरती प्रक्रियेतून रुजू झालेल्या राज्यातील १२ शिक्षण सेवकांचा गेल्या काही काळात अकाली मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली असून, या दिवंगत सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शिक्षण सेवकांच्या वतीने शनिवारी, २५ एप्रिल रोजी रोहा शहरात शांततामय ‘कॅन्डल मार्च’ (मौन मोर्चा) आयोजित करण्यात आला आहे.

हा मौन मोर्चा सायंकाळी ठीक ६ वाजता रोहा शहरातील मारुती चौक येथून सुरू होईल आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापाशी त्याचा समारोप होईल. अलीकडेच निधन झालेले सिंधुदुर्ग येथील शिक्षण सेवक कै. प्रशांत तांबे यांच्यासह राज्यातील इतर दिवंगत सहकाऱ्यांच्या स्मृतीस यावेळी उजाळा देण्यात येणार आहे.

या मोर्चाबाबतचे रीतसर निवेदन रोहा तहसीलदार, गट शिक्षणाधिकारी, पोलीस निरीक्षक आणि मुख्याधिकारी (नगरपरिषद) यांना देण्यात आले आहे. वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आणि पूर्णपणे शांतता राखली जाईल, याची दक्षता आयोजकांकडून घेतली जाणार आहे.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शोभा खांडेकर, कल्याणी भोसले, प्रशांत अहिरराव, शिवकुमार माने, निवृत्ती शिंदे, रणजीत मिरगणे, स्वप्निल पाटील, अतुल बोंद्रे, प्रभाकर तुपे, मयूर पाटील, शिवशंकर डांगे हे अथक परिश्रम घेत आहेत.

“राज्यातील १२ तरुण शिक्षण सेवकांचे अकाली निधन ही अत्यंत क्लेशदायक बाब आहे. शिक्षण सेवा बजावत असतानाच ते आपल्यातून निघून गेले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आम्ही हा शांततामय मार्ग निवडला आहे. प्रशासनाने या सामाजिक आणि भावनिक विषयाचे गांभीर्य ओळखून सहकार्य करावे, हीच विनंती.”
— शोभा खांडेकर, शिक्षण सेवक प्रतिनिधी

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!