विभागीय कार्यालयाचे महाडकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?
८७ पदे रिक्त असल्याने ग्रामीण व लांब पल्ल्याच्या फेऱ्यांवर परिणाम
महाड | मिलिंद माने
मुंबई-गोवा महामार्गावरील कोकणातील मध्यवर्ती केंद्र आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाड एसटी बस स्थानकात सध्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. महाड आगारात कर्मचारी संख्या अपुरी असल्याने अनेक फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली असून, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, महाडला मंत्रिपद असतानाही महामंडळाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
ऐतिहासिक शहराची गळचेपी?
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड शहरात आणि किल्ले रायगडावर दरवर्षी लाखो पर्यटक येतात. तालुक्यातील ग्रामीण भागासाठी एसटी हाच एकमेव आधार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पेण (रामवाडी) येथील विभागीय कार्यालयातील अधिकारी महाड आगार बंद करण्याची सुपारी घेत आहेत का? असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. महाड आगाराला नवीन बसेस न देणे, चालक-वाहकांची कमतरता भासवणे आणि सुविधांकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत.
सुविधांचा वानवा
आगारातील स्वच्छतागृह अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बांधले गेले, तर पिण्याच्या पाण्याची सोय सामाजिक संस्थेच्या मदतीने करावी लागली आहे. महामंडळाचे स्वच्छता कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर नवीन भरती झालेली नाही. याशिवाय आगारातील उपहारगृहही अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. कर्मचारी आणि प्रवासी अशा दोघांच्याही मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
८७ पदे रिक्त; फेऱ्यांचे नियोजन कोलमडले
महाड आगारात सध्या तब्बल ८७ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे लांब पल्ल्याच्या आणि ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. शेजारील माणगाव, खेड, चिपळूण आणि दापोली आगारांना पुरेसा कर्मचारी वर्ग आणि बसेस उपलब्ध असताना महाडवरच अन्याय का, असा सवाल केला जात आहे. इतर आगारांच्या बसेस महाडमधून भरून जात असल्याने स्थानिक प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.
महाड-पनवेल विनावाहक सेवेची मागणी
मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक प्रवासी पनवेलपर्यंत एसटीने जाऊन पुढे रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. महाड आगाराच्या विनावाहक बसला चांगला प्रतिसाद मिळत असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या सेवेची गळचेपी केली जात असल्याचा आरोप होत आहे. संध्याकाळी ६ नंतर पनवेलसाठी पुरेशी बस सेवा उपलब्ध नसल्याने नोकरदार आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
उत्पन्न वाढीचे ‘टार्गेट’ पण साधनसामग्री शून्य
विभागीय कार्यालय आगारांना उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट (टार्गेट) देते, मात्र चालक-वाहकांचे संख्याबळ आणि पुरेशा बसेस नसताना उत्पन्न वाढवायचे कसे, असा पेच आगार प्रमुखांसमोर आहे. धुळे, नाशिक, जळगाव, पुणे यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे नियोजन करताना प्रशासनाची मोठी कसरत होत आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नी तातडीने लक्ष देऊन महाड आगाराला गतवैभव मिळवून द्यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
