पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे कल; मातीच्या स्टायलिश बाटल्यांना तरुणांचा प्रतिसाद
उरण | घन:श्याम कडू
एप्रिल महिन्यातील कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या उरणकरांना आता पुन्हा एकदा पारंपरिक मातीच्या माठाचा आधार वाटू लागला आहे. फ्रिजमधील अतिथंड पाण्यापेक्षा माठातील नैसर्गिक थंडावा आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याने, घराघरात ‘माठ’ दाखल झाले आहेत. यामुळे बाजारपेठांमध्ये मातीचे माठ, सुरई आणि आकर्षक डिझाइनच्या मातीच्या बाटल्यांची मागणी प्रचंड वाढली असून बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत.
बाजारपेठांमध्ये ग्राहकांची झुंबड
उरण शहरातील विविध भागांतील मातीच्या वस्तूंच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी होत आहे. वाढत्या मागणीमुळे विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसत आहे. सध्या बाजारात साध्या माठापासून ते रंगीबेरंगी नक्षीकाम केलेल्या बाटल्यांपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या वस्तूंच्या किमती २५० रुपयांपासून सुरू होऊन १००० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत, तरीही नागरिक हौसेने खरेदी करताना दिसत आहेत.
पर्यावरणपूरक ट्रेंड आणि तरुणाईची पसंती
विशेष म्हणजे, यंदा मातीच्या स्टायलिश बाटल्यांना तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक तरुण या बाटल्या खरेदी करून त्यावर स्वतः रंगकाम (Painting) करून ‘वैयक्तिक टच’ देण्याचा ट्रेंड फॉलो करत आहेत. प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याकडे नागरिकांचा कल वाढला असल्याचे हे सकारात्मक चित्र आहे.
मुक्या पक्ष्यांसाठी मातीची भांडी
उन्हाळ्याच्या तीव्रतेत स्वतःसोबतच मुक्या पक्ष्यांची तहान भागवण्यासाठीही उरणकर सरसावले आहेत. अनेक नागरिक आपल्या गच्चीवर, बाल्कनीमध्ये आणि झाडांवर लहान मातीची भांडी ठेवून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करत आहेत. विविध गृहनिर्माण सोसायट्या आणि सार्वजनिक ठिकाणीही असे उपक्रम राबवले जात आहेत.
| आरोग्याचा नैसर्गिक फॉर्म्युला: माठातील पाणी माठातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते. मातीच्या सूक्ष्म छिद्रांमुळे बाष्पीभवन होऊन पाण्याचे तापमान संतुलित राहते, जे पचनासाठी उपयुक्त ठरते. फ्रिजमधील अतिथंड पाण्यामुळे होणाऱ्या घशाच्या आणि पोटाच्या तक्रारी टाळण्यासाठी माठातील पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे. आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक असल्यानेच ‘माठ’ पुन्हा लोकप्रिय ठरत आहे. -संदीप जाधव (ग्राहक) |
