स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; भंगार व्यावसायिकांना बजावल्या कायदेशीर नोटिसा
धाटाव । शशिकांत मोरे
रोहा तालुक्यातील कोलाड आणि परिसरात भंगार माफियांनी मांडलेल्या उच्छादामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, याविरोधात जनक्षोभ उसळल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोलाड पोलिसांनी या परिसरातील भंगार व्यावसायिकांना बोलावून त्यांना कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत. “कायदा व सुव्यवस्थेचे तसेच सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा,” असा कडक इशारा कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारने यांनी दिला आहे.
परिसराला बकालपणा आणि चोऱ्यांमध्ये वाढ
मुंबई-गोवा महामार्गावरील तळवली गाव ते भिरा फाटा, वरसगाव, पुगाव, पुई आणि कोलाड परिसरात ठिकठिकाणी जागा भाड्याने घेऊन भंगार व्यवसायाची मोठी दुकाने थाटली गेली आहेत. या अनधिकृत व्यवसायामुळे परिसराला बकालपणा प्राप्त झाला असून, परिसरात चोऱ्यांचे प्रमाणही कमालीचे वाढले आहे. स्थानिकांनी या त्रासाविरोधात वृत्तपत्रांच्या माध्यमातून आवाज उठवताच पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत.
कामगारांची माहिती देणे अनिवार्य
पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रत्येक भंगार अड्ड्यावर किती लोक काम करतात, त्यांची संपूर्ण माहिती आणि ओळखपत्रांचे तपशील (उदा. पॅन कार्ड किंवा इतर शासकीय ओळखपत्रे) पोलिसांना कळवणे अनिवार्य आहे. विशेषतः परप्रांतीय कामगारांच्या वाढत्या संख्येमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
व्यापाऱ्याला मारहाणीचा प्रकार ताजा
काही महिन्यांपूर्वी खांब येथील एका स्थानिक व्यापाऱ्याचा माल भंगार विक्रेत्याच्या गाडीतून चोरीला गेला होता. या प्रकरणाचा जाब विचारला असता, संबंधित व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. या घटनेमुळे भंगार व्यावसायिकांची मुजोरी समोर आली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेचे स्थानिकांनी स्वागत केले आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
पोलिसांनी जरी नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला असला, तरी हे अनधिकृत धंदे कायमस्वरूपी बंद व्हावेत, अशी मागणी जोर धरत आहे. ज्या हद्दीत हे व्यवसाय सुरू आहेत, त्या ग्रामपंचायत प्रशासनाकडून यावर काय कारवाई केली जाते, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
