• Mon. Apr 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबाग जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची परवड; बाकड्यांवर शिकाऊ डॉक्टरांच्या बॅगा, रुग्णांचे नातेवाईक मात्र उभेच

ByEditor

Apr 27, 2026

रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष; शस्त्रक्रिया विभागाबाहेर नातेवाईकांना बसावे लागतेय जमिनीवर

अलिबाग | सागर पेरेकर
रायगड जिल्हा रुग्णालयातील नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या आवारात रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी ठेवलेल्या बाकड्यांचा ताबा सध्या शिकाऊ डॉक्टरांच्या बॅगांनी घेतल्याचे संतापजनक चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तासनतास उभ्यानेच प्रतीक्षा करावी लागत असून, प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

बाकड्यांवर बॅगांचा ‘राखीव’ कोटा?

सोमवारी दुपारी शस्त्रक्रिया विभागाबाहेर हा प्रकार प्रकर्षाने दिसून आला. रुग्णांसोबत आलेले नातेवाईक शस्त्रक्रिया होईपर्यंत बसण्यासाठी जागा शोधत होते, मात्र तेथील सर्व बाकड्यांवर मेडिकल कॉलेजमधील शिकाऊ डॉक्टरांनी आपल्या बॅगा टाकून ठेवल्या होत्या. जागा शिल्लक नसल्याने अनेक नातेवाईकांना भिंतीचा आधार घेत उभे राहावे लागले, तर काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना चक्क जमिनीवर बसण्याची वेळ आली.

परीक्षेचे कारण अन् नातेवाईकांना मरण

याबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता, सध्या शिकाऊ डॉक्टरांची परीक्षा सुरू असून ते रुग्ण तपासणीसाठी (Clincials) येथे आले असल्याचे सांगण्यात आले. बॅगा ठेवण्यासाठी अन्य कोणतीही सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने त्यांनी बाकड्यांचा वापर केल्याचे समर्थन काही कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या बॅगांसाठी हक्काची बाकडी अडवल्याने रुग्णालयात येणाऱ्या सामान्य जनतेची मोठी गैरसोय होत आहे.

प्रशासनाकडून गांभीर्याची अपेक्षा

जिल्हा रुग्णालयात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. शस्त्रक्रिया विभागात रुग्ण असताना नातेवाईक आधीच मानसिक दडपणाखाली असतात. अशा परिस्थितीत त्यांना किमान बसण्यासाठी जागा न मिळणे ही मोठी शोकांतिका आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांना या ढिसाळ नियोजनाचा मोठा फटका बसत आहे. रुग्णालय प्रशासनाने शिकाऊ डॉक्टरांच्या सामानासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी आणि नातेवाईकांसाठी असलेली बाकडी तत्काळ मोकळी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!