• Mon. Apr 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

साहित्यिक रमेश धनावडे यांना ‘रायगड रत्न’ पुरस्कार प्रदान; रोह्यात दिमाखदार सोहळा संपन्न

ByEditor

Apr 27, 2026

​रोहा (प्रतिनिधी): गेल्या ५७ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या वृत्तपत्र समूहाच्या वतीने अलिबाग येथील प्रसिद्ध साहित्यिक रमेश धनावडे यांना साहित्यातील योगदानाबद्दल ‘रायगड रत्न’ पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. रोहा येथील चिंतामणराव देशमुख सभागृहात हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.

या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर टीव्ही अभिनेत्री व ‘बिग बॉस’ फेम जान्हवी किल्लेकर, विधानसभा आमदार अनिकेत तटकरे, रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक, सिटी बेल चॅनलचे मालक मंदार दोंदे, जेएसडब्ल्यूचे पीआरओ कुमार थत्ते, रायगड जिल्हा प्रमुख दत्तात्रेय कुलकर्णी यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

रमेश धनावडे यांनी साहित्य क्षेत्रात आपली वेगळी मुद्रा उमटवली आहे. त्यांची ‘मनतरंग’, ‘उर्मी’, ‘जीवनगाणे’, ‘कवितेच्या सुरातून’ आणि ‘नादखुळा असेच काहीतरी’ यांसारखी सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे ‘जीवनगाणे’ आणि ‘कवितेच्या सुरातून’ हे स्तंभ वाचकप्रिय ठरले आहेत. तसेच ‘दैनिक पुढारी’मधून त्यांच्या राजकीय व सामाजिक वात्रटिका ‘गुदगुल्या’ या नावाने प्रसिद्ध झाल्या आहेत. डिजिटल माध्यमातही ‘बी पॉझिटिव्ह’ या मुलाखत मालिकेच्या माध्यमातून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

धनावडे यांनी केवळ साहित्यच नव्हे, तर प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाचे ‘माजी विशेष कार्यकारी अधिकारी’ म्हणून जबाबदारी सांभाळली असून, लायन्स क्लब अलिबागचे ते माजी प्रेसिडेंट आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून त्यांचे काव्यवाचन प्रसारित झाले असून, ‘गोष्ट तिच्या प्रेमाची’ या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेले गीत आर्या आंबेकर यांनी गायले आहे. सध्या ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे अलिबाग तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

यापूर्वी त्यांना रायगड भूषण पुरस्कार, कोमसापचा प्रथम पुरस्कार, रायगड जिल्हा पत्रकार संघाचा र. वा. दिघे पुरस्कार, कृषीवल कौतुक पुरस्कार आणि म. ना. पाटील साहित्य पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘रायगड रत्न’ पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला असून, या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!