• Mon. Apr 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

केळवणे हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींचे ‘NMMS’ परीक्षेत देदीप्यमान यश

ByEditor

Apr 27, 2026

पनवेल (वार्ताहर) : नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत को. ए. सो. केळवणे हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले आहे. कु. आर्या कांचन घरत व कु. अंशिका निवास पाटील या विद्यार्थिनींची या प्रतिष्ठेच्या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असून, त्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

​या पात्र विद्यार्थिनींना दरवर्षी १२ हजार रुपये याप्रमाणे चार वर्षांसाठी एकूण ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. विद्यार्थिनींच्या या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या पुढील शिक्षणाची वाट सोपी होणार आहे.

​या यशाचे औचित्य साधून शाळेत एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळा समितीचे चेअरमन श्री. कोळी व सदस्य डॉ. शिवकर, उल्हास ठाकूर, आशिष घरत यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

​मुख्याध्यापक रामचंद्र गणा पाटील यांनी विद्यार्थिनींच्या कौतुकास्पद कामगिरीचा गौरव केला. या परीक्षेत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणारे शिक्षक नवनित कांबळे यांचाही विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

​या सोहळ्याला ज्येष्ठ शिक्षक एम. एस. पाटील, के. टी. ठाकूर, अनमोल पगारे, भूमिका ठाकूर, देविदास गांगुर्डे, निखिल मांडवकर, आनंद मनवर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी संतोष पाटील, मधुकर पाटील आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केळवणे गाव आणि परिसरातून या गुणवंत विद्यार्थिनींचे आणि शाळेचे कौतुक होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!