• Tue. Apr 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोह्याची जीवनवाहिनी धोक्यात; कुंडलिका प्रदूषणाविरोधात तहसीलदारांना निवेदन

ByEditor

Apr 28, 2026
Oplus_16908288

धाटाव | शशिकांत मोरे
रोहेकरांची जीवनवाहिनी समजली जाणारी कुंडलिका नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्यामुळे नदीचे रूपांतर ‘गटारगंगे’त झाले आहे. या गंभीर प्रश्नावर ‘नदी बचाव संघर्ष समिती’ आता आक्रमक झाली असून, समितीच्या शिष्टमंडळाने रोहा तहसीलदार देशमुख यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

​प्रशासकीय अनास्था आणि निधीचा अपव्यय

​कुंडलिका नदीचे परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले (दादा) यांच्याशी असलेले नाते जगजाहीर आहे, ज्यामुळे या नदीची ख्याती जागतिक स्तरावर आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज या नदीची दुरवस्था झाली आहे. गेल्या १५-२० वर्षांत रोहा नगरपालिकेने विकासाच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी आणला, परंतु त्याचे योग्य नियोजन न झाल्याने नदी संवर्धन केवळ कागदावरच राहिले आहे. शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे सांडपाण्याचे प्रमाण वाढले आहे, मात्र कोणतीही प्रक्रिया न करता हे पाणी थेट नदीत सोडले जात आहे.

​कायद्याचे उल्लंघन आणि कारवाईची मागणी

​जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा १९७४ नुसार नदी प्रदूषित करणे हा फौजदारी गुन्हा असून, यासाठी पाच वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हे बाब निदर्शनास आणून देऊनही अद्याप रोहा नगरपालिकेवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी खंत समितीने व्यक्त केली आहे. “विकासाचा केवळ झगमगाट दिसतो, मात्र मूलभूत प्रश्न तसेच आहेत. शेजारच्या शहरांनी दूरदृष्टी ठेवून विकास केला, पण नियोजनशून्य कारभारामुळे रोहा मागे पडला आहे,” अशी टीकाही यावेळी करण्यात आली.

​निवेदन देताना समितीचे ज्येष्ठ सदस्य दिलीप वडके म्हणाले की, “कुंडलिका नदी वाचवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. जर प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.” या वयातही नदीसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी दिलीप वडके, अप्पासाहेब देशमुख, विजय देसाई, सुधीर कुमार यादव, उदय करडे, महेश बामूगडे, सुहास खरीवले, रोहावाला (महिला प्रतिनिधी), प्रथमेश शिर्के, ॲड. दीपक भगत, यज्ञेश भांड आणि उद्धव आव्हाड यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!