व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण; महाड पोलिसांकडून तपास सुरू
महाड | मिलिंद माने
महाड शहरात चोरट्यांनी आपले लक्ष आता थेट सराफ बाजाराकडे वळवले असून, मंगळवारी (२८ एप्रिल) पहाटेच्या सुमारास शहरातील तीन विविध ज्वेलर्स दुकानांवर दरोडा टाकण्याचा धाडसी प्रयत्न करण्यात आला. मात्र, दुकानांची चोख सुरक्षा व्यवस्था आणि चोरट्यांचे अपयश यामुळे मोठी वित्तहानी टळली आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात मात्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
एकाच रात्री तीन दुकानांना लक्ष्य
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी नियोजनबद्धरीतीने शहरातील गजबजलेल्या भागातील तीन दुकानांना लक्ष्य केले. तांबट आळी येथील ‘कौशल ज्वेलर्स’चे शटर तोडण्यात चोरटे यशस्वी झाले. मात्र, दुकानातील अंतर्गत तिजोरी आणि प्रगत सुरक्षा अलार्म प्रणालीमुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. चवदार तळे परिसर येथील ‘कृष्णा ज्वेलर्स’चे शटर उचकटण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु शटर मजबूत असल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न देखील फसला. वीरेश्वर मंदिर परिसरातील ‘सिद्धिविनायक ज्वेलर्स’ येथेही चोरट्यांनी शटर तोडले. मात्र, सध्या त्या ठिकाणी सराफ व्यवसायाऐवजी कटलरीचे दुकान सुरू असल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून, या टोळीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
”शहरातील मुख्य बाजारपेठेत अशा प्रकारे एकाच रात्री तीन दुकाने फोडण्याचा प्रयत्न होणे ही गंभीर बाब आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करावे,” अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.या घटनेमुळे महाडमधील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, व्यापाऱ्यांनी स्वतःच्या दुकानांची सुरक्षा अधिक कडक करण्याच्या सूचना व्यापारी संघटनेतर्फे देण्यात आल्या आहेत.
