किल्ला नाक्याजवळ मध्यरात्री घडली घटना; मिलगिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
धाटाव | शशिकांत मोरे
कोलाड-रोहा या मुख्य मार्गावरील किल्ला नाक्याजवळ दुचाकीचा तोल गेल्याने झालेल्या भीषण अपघातात १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अश्विन मिलगिरे असे या मृत तरुणाचे नाव असून, तो वरसे येथील रहिवासी होता. या घटनेमुळे वरसे परिसरात शोककळा पसरली असून मिलगिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अश्विन हा काळभैरव वरसे संघाचा सक्रिय कबड्डीपटू होता. मंगळवारी मध्यरात्री तो आपल्या मित्रांसह दुचाकीवरून कोलाडकडून रोह्याच्या दिशेने घरी परतत होता. किल्ला नाक्याजवळ आला असता, अचानक दुचाकीचा तोल गेल्याने तो रस्त्यावर कोसळला. अश्विनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे त्याच्या सोबत असलेल्या मित्रांच्या लक्षात आले.
मध्यरात्र असल्याने सुरुवातीला मदतीसाठी अडचणी निर्माण झाल्या, मात्र अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत अश्विनला तातडीने रोह्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
प्रवासादरम्यान अश्विनच्या डोक्यात हेल्मेट नसल्यामुळे त्याच्या डोक्याला झालेली जखम जीवघेणी ठरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, अपघाताचे नेमके कारण काय होते याचा अधिक तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.
वरसे परिसरावर शोककळा: अश्विन हा एक होतकरू कबड्डी खेळाडू होता. खेळाडू वृत्ती आणि मनमिळावू स्वभावामुळे तो मित्रपरिवारात लाडका होता. त्याच्या निधनाने स्थानिक क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
