माणगाव | सलीम शेख
माणगाव तालुक्यातील राजकारणाला शुक्रवारी एक मोठी कलाटणी मिळाली. लोणेरे विभागातील शिवसेना (उबाठा) गटाचे प्रभावी नेते आणि प्रसिद्ध उद्योजक सिताराम उभारे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील सत्तासमीकरणे बदलण्याची चिन्हे असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना गटांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून उभारे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा लोणेरे आणि गोरेगाव परिसरात रंगली होती. अखेर गुरुवारी सायंकाळी उलवे येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी अधिकृतपणे भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांवरील विश्वास आणि विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश करत असल्याचे उभारे यांनी स्पष्ट केले.
सिताराम उभारे यांच्यासोबत अंबर्ले गावचे सरपंच अंकुश उभारे, उपसरपंच दीपेश खाडे आणि ग्रामपंचायत सदस्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय परशुराम उभारे, पंढरी कदम, मंगेश कदम, रमेश उभारे, सुनील शिंदे (बौद्धवाडी अध्यक्ष), रामचंद्र उभारे (तंटामुक्त अध्यक्ष) आणि उद्योजक अरविंद उभारे यांच्यासह मुगवली, मोर्बा परिसरातील शेकडो कार्यकर्ते व मुंबईस्थित ग्रामस्थांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.
या सोहळ्याला महाड विधानसभा प्रमुख बिपिन महामुनकर, दक्षिण रायगड उपाध्यक्ष भालचंद्र महाले, युवा नेते युवराज मुंडे, ज्येष्ठ नेते सुनीलबापू सोनगिरे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
”भाजपच्या माध्यमातून लोणेरे, गोरेगाव आणि माणगाव परिसरात पक्ष संघटना बळकट करण्यावर माझा भर असेल. चिंचवली-गोरेगाव येथील दत्तात्रय देवस्थान ट्रस्टसाठी ६ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. प्रवीण दरेकर यांच्या सहकार्याने नदी संवर्धन, तलाव आणि पर्यटनाचे अनेक प्रलंबित प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेऊन विकासकामांना गती दिली जाईल.”
— सिताराम उभारे, नवनियुक्त भाजप नेते.
