उरण (प्रतिनिधी): उरण तालुका रिक्षा युनियनचे संस्थापक, विद्यमान अध्यक्ष आणि नागाव-म्हातवली येथील ज्येष्ठ समाजसेवक प्रफुल्ल किशोर पुरो (७५), ज्यांना सर्वजण प्रेमाने ‘अण्णा’ म्हणून ओळखत, त्यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उरण तालुक्यासह रिक्षा चालक-मालक वर्गावर शोककळा पसरली असून, एका खंबीर नेतृत्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो यांचे ते मोठे बंधू होते.
प्रफुल्ल पुरो हे केवळ युनियनचे नेते नव्हते, तर सामाजिक कार्यात सदैव तत्पर राहणारे व्यक्तिमत्व होते. सामान्यांच्या अडचणीला धावून जाणे आणि गरजू नागरिकांना मदतीचा हात देणे, या गुणांमुळे त्यांनी समाजात वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच उरणमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रिक्षा चालकांनी दुपारनंतर आपली सेवा बंद ठेवून त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला.
अण्णांच्या जाण्याने नागाव-म्हातवली परिसरातील सामाजिक क्षेत्रात आणि रिक्षा चालक-मालकांच्या हक्कासाठी लढणारा एक संवेदनशील आधार हरपल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सोमवारी सायंकाळी नागाव येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र लैलेश पुरो यांनी त्यांना भडाग्नी दिला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय पदाधिकारी, रिक्षा युनियनचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा, दोन मुली आणि जावई असा मोठा परिवार आहे.
