नागरिकांच्या संतापानंतर पालिकेला जाग; परिसर ‘बॅनरमुक्त’ ठेवण्याचे प्रशासनासमोर आव्हान
धाटाव | शशिकांत मोरे
रोहा-अष्टमी नगरपरिषद हद्दीतील अष्टमी नाक्यावर अपघातांना निमंत्रण देणारे धोकादायक आणि अनधिकृत बॅनर अखेर हटवण्यात आले आहेत. सोमवारी पहाटे नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई केली. गेल्या अनेक दिवसांपासून या वळणावरील बॅनरमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. या कारवाईमुळे अष्टमी नाक्याने मोकळा श्वास घेतला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
अपघातांचे सत्र आणि जनरेटा
अष्टमी नाका हे रोहा शहराचे प्रवेशद्वार असून येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. कुंडलिका नदीवरील जुन्या आणि नवीन पुलावरून येणारी वाहतूक, वळणावरील हायमॅक्स दिवे आणि विद्युत पोल यांच्या आधारावर येथे अनधिकृतपणे मोठमोठे फ्लेक्स लावले जात होते. यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने वारंवार छोटे-मोठे अपघात घडत होते. प्रशासनाच्या या दुर्लक्षाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. अखेर जनरेट्यापुढे झुकत प्रशासनाने हे अडथळे दूर केले आहेत.
नगराध्यक्षांच्या संकल्पनेला हरताळ?
नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे यांनी पदभार स्वीकारल्यापासून ‘स्वच्छ आणि सुंदर रोहा’ साकारण्यासाठी प्लास्टिक मुक्ती आणि बॅनर मुक्तीची नियमावली जाहीर केली आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात आजही अनेक ठिकाणी अनधिकृत बॅनर उभे असल्याचे चित्र दिसते. अष्टमी नाक्यावर कारवाई होते, मात्र दोन दिवसांत पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होते, असा अनुभव नागरिकांनी बोलून दाखवला.
कायमस्वरूपी कारवाईची मागणी
यापुढे अष्टमी नाका सदैव बॅनरमुक्त राहावा, यासाठी विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. नगराध्यक्षा वनश्री शेडगे, बांधकाम सभापती राजेंद्र जैन, महिला बाल कल्याण सभापती नीता हजारे, नगरसेवक प्रशांत कडू आणि फराह पानसरे यांनी याकामी प्रशासनाला कडक सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा त्रस्त अष्टमीकर व्यक्त करत आहेत. प्रवेशद्वार स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ही कारवाई सातत्याने सुरू राहणे गरजेचे आहे.

