• Tue. Apr 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

​मुंबई-गोवा महामार्गावर आंबेवाडीत कामाचा बोजवारा; ठेकेदाराच्या ‘एक ना धड…’ कारभारामुळे प्रवाशांचे हाल!

ByEditor

Apr 28, 2026

​रस्त्यांची दुरवस्था आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; अपघाताची टांगती तलवार, जबाबदार कोण?

​कोलाड | विश्वास निकम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील आंबेवाडी बाजारपेठेतील विकासकामांचा पुरता फज्जा उडाला आहे. मागील १७ वर्षांपासून सुरू असलेल्या महामार्गाच्या कामात आता आंबेवाडी येथील अर्धवट गटारे, निकृष्ट साईड पट्ट्या आणि बायपास रस्त्यांच्या समस्यांनी भर घातली आहे. संबंधित ठेकेदार सध्या केवळ उड्डाणपुलाच्या कामात मग्न असल्याने स्थानिक बाजारपेठेत ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. या अव्यवस्थेमुळे एखाद्याचा नाहक बळी गेला, तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.

​अर्धवट कामे आणि अपघाताचे निमंत्रण

​आंबेवाडी बाजारपेठेतील सांडपाणी महिसदरा नदीला मिळते. मात्र, येथील पोस्ट ऑफिससमोरील मोरीचे काम गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अर्धवट स्थितीत आहे. गोदी नदीच्या पुलापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू असले तरी, त्याठिकाणी साईड पट्ट्यांचे काम रखडलेले आहे. वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहनचालकांना ‘तारेवरची कसरत’ करावी लागत आहे. अरुंद रस्त्यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असून अपघाताची भीती वाढली आहे.

​कचरा आणि दुर्गंधीचा विळखा; आरोग्याचा प्रश्न गंभीर

​गोदी नदीजवळ गटारासाठी मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र, काम पुढे सरकण्याऐवजी या खड्ड्यात परिसरातील कचरा टाकला जात आहे. विशेषतः बॉयलर कोंबड्यांची पिसे आणि टाकाऊ पदार्थ येथे फेकले जात असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना नाक मुठीत धरून येथून प्रवास करावा लागत असून, परिसरात साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

​सिग्नल यंत्रणेची मागणी

​उड्डाणपुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिले असले, तरी पुलाचे टोक पोस्ट ऑफिसजवळ संपत आहे. यामुळे या भागात भविष्यात वाहतुकीचा वेग आणि घनता प्रचंड वाढणार आहे. रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी तातडीने सिग्नल यंत्रणा बसवणे गरजेचे असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

​नागरिकांचा इशारा

“देशमुख चाळ, पोस्ट ऑफिस आणि शिवनेरी मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठेकेदार केवळ मोठ्या कामांकडे लक्ष देत असून अंतर्गत समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने न पाहिल्यास मोठ्या आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.” असा संतप्त इशारा नागरिकांनी दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!