• Wed. Apr 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

लग्नपत्रिकांची जागा आता ‘डिजिटल’ क्लिकने घेतली; पारंपरिक जिव्हाळा हरवला, तंत्रज्ञानाचा डोस वाढला!

ByEditor

Apr 29, 2026

नातेसंबंधांतील भेटीगाठींची जागा आता फॉरवर्ड मेसेजने घेतली

​धाटाव | शशिकांत मोरे
सध्याच्या धावपळीच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. दैनंदिन गरजांपासून ते थेट लग्नसोहळ्याच्या नियोजनापर्यंत सोशल मीडियाने शिरकाव केला आहे. एकेकाळी घराघरात जाऊन, आग्रहाचे आमंत्रण देऊन वाटल्या जाणाऱ्या पारंपरिक लग्नपत्रिका आता इतिहास जमा होऊ लागल्या असून, त्यांची जागा ‘डिजिटल इन्व्हिटेशन’ने घेतली आहे. निमंत्रण देण्याची धावपळ कमी झाली असली, तरी त्यातील पारंपरिक जिव्हाळा आणि आपुलकी मात्र हरवत चालल्याची भावना व्यक्त होत आहे.

​बदलत्या ट्रेंडचा परिणाम: ‘आमच्या मामाच्या लग्नाला यायचं बरं…’ आता गायब!

​पूर्वी लग्नपत्रिका छापताना ती इतरांपेक्षा सुंदर कशी दिसेल, यासाठी मोठी चढाओढ असायची. पत्रिकेत आपले नाव कुठे आहे, हे शोधण्याची उत्सुकता शिगेला असायची. विशेषतः ‘बच्चे कंपनी’चे आवाहन, मामा-मामी, आत्या-जावई यांची नावे स्वतंत्रपणे छापण्याची एक वेगळीच हौस होती. मात्र, आता डिजिटल पत्रिकेमुळे हा मजकूर आटोपशीर झाला असून, लहान मुलांच्या निरागस नावांची जागा केवळ मोजक्या मजकुराने घेतली आहे. परिणामी, लग्नातील तो जिव्हाळा आता ‘कमी’ होत चालल्याचे जाणवत आहे.

​डिजिटल क्रांतीचे फायदे आणि तोटे

​”भेटून पत्रिका दिल्याने नातेवाईकांमध्ये जो सन्मान आणि जिव्हाळा मिळायचा, तो आता व्हॉट्सॲपच्या ‘फॉरवर्ड’ मेसेजमध्ये हरवला आहे. मात्र, बदलत्या काळाची गरज म्हणून तंत्रज्ञानाचा हा स्वीकार अपरिहार्य ठरला आहे.” ​

गावोगावी फिरून पत्रिका वाटण्याचा वेळ आणि शारीरिक कष्ट वाचले आहेत. पत्रिका छपाईचा अनावश्यक खर्च टाळून तो पैसा मुला-मुलींच्या शिक्षणासाठी किंवा सामाजिक कार्यासाठी वापरण्याकडे कल वाढला आहे. कागदाचा वापर टाळल्यामुळे वृक्षतोड थांबण्यास मदत होऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लागत आहे.​ व्हॉट्सॲप, ईमेल आणि व्हिडिओ इन्व्हिटेशनमुळे जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या नातेवाईकाला क्षणात आमंत्रण देणे शक्य झाले आहे.

​छपाई व्यवसायाला घरघर; ऑफसेट मालक संकटात

​सोशल मीडियाच्या अतिवापराचा मोठा फटका लग्नपत्रिका छपाई व्यवसायाला बसला आहे. कोरोना काळानंतर हा व्यवसाय अक्षरशः मोडकळीस आला आहे. आता केवळ देवाच्या देव्हाऱ्यात ठेवण्यापुरती किंवा मोजक्या प्रतिष्ठितांसाठीच पत्रिका छापल्या जातात. ग्राहकांचा ओढा डिजिटल डिझाइनकडे वाढल्याने ऑफसेट प्रिंटिंग प्रेस चालवणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

​आजच्या हायटेक युगात जरी डिजिटल निमंत्रणांनी काम सोपे केले असले, तरी प्रत्यक्ष भेटीगाठीतून मिळणारा आनंद आणि मान-पान आता कमी झाला आहे. ग्रामीण भागातही हा बदल वेगाने स्वीकारला जात आहे. तंत्रज्ञान प्रगती करत असले तरी, लग्नातील तो माणुसकीचा ओलावा टिकवून ठेवण्याचे आव्हान आता नव्या पिढीसमोर आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!