• Wed. Apr 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

खोपटे येथील ‘ओमसाई महिला बचत गटा’चा रेशन परवाना रद्द; पुरवठा विभागाची धडक कारवाई

ByEditor

Apr 29, 2026

उरण | अनंत नारंगीकर
गोरगरिबांच्या हक्काच्या धान्यात डल्ला मारणाऱ्या आणि वितरणामध्ये अनियमितता करणाऱ्यांविरुद्ध उरण प्रशासनाने आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. उरण तालुक्यातील खोपटे येथील ‘ओमसाई महिला बचत गटा’च्या स्वस्त धान्य दुकानावर (FPS ID: 152026500133) तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करण्यात आली असून, या दुकानाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.

तक्रारींची दखल आणि प्रत्यक्ष पाहणी

मौजे खोपटे (ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा) येथील या बचत गटाच्या कामकाजाबाबत शिधापत्रिकाधारकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसा २८ तारखेला महसूल विभागाच्या पथकाने दुकानाला प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली असता, तिथे धक्कादायक बाबी समोर आल्या.

तपासात असे निष्पन्न झाले कि, या दुकानात शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार धान्य दिले जात नव्हते, धान्य वितरणामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून शासकीय नियमांचे व अटींचे उघडपणे उल्लंघन करण्यात आल्याचे उघड झाले.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था

या गंभीर प्रकारानंतर सदर दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान, खोपटे गावातील नागरिकांची अन्नावाचून परवड होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. या दुकानातील सर्व शिधापत्रिका तात्पुरत्या स्वरूपात नजीकच्या दुसऱ्या स्वस्त धान्य दुकानाला जोडण्यात आल्या आहेत, जेणेकरून नागरिकांना त्यांचे धान्य वेळेवर मिळेल.

प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे तालुक्यातील इतर रेशन दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. अनियमीतता करणाऱ्यांना हा थेट इशारा असल्याचे मानले जात असून, खोपटे ग्रामस्थांनी या कारवाईचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.

“स्वस्त धान्य वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता असणे अत्यंत आवश्यक आहे. गरिबांच्या हक्काचे धान्य नाकारणाऱ्या किंवा त्यात अनियमितता करणाऱ्या कोणत्याही परवानाधारकाची गय केली जाणार नाही.”
— गजानन देशमुख (पुरवठा अधिकारी, उरण)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!