श्रीवर्धन | संदेश घोलप
रायगड जिल्ह्याच्या राजकारणात ‘किंगमेकर’ समजल्या जाणाऱ्या तटकरे कुटुंबाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या दिवेआगर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडाला असून, ‘दिवेआगर विकास आघाडी’चे विजय सुदाम तोडणकर यांनी सरपंच पदावर आपले नाव कोरले आहे.
हुकूमशाहीला सुसंस्कृत गावाची चपराक
काही दिवसांपूर्वी म्हसळा नगरपंचायतीमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर आता दिवेआगरनेही सत्ताधाऱ्यांना चपराक लगावली आहे. निवडून आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय तोडणकर यांनी थेट खासदार सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. “लोकांना गृहीत धरणे आणि हुकूमशाही पद्धतीने कारभार करणे दिवेआगरसारख्या सुशिक्षित गावाला मान्य नाही, हेच या निकालाने सिद्ध केले आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला विजय साजरा केला.
सरपंच पदाची आकडेवारी:
सरपंच पदाच्या अटीतटीच्या लढतीत तोडणकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला:
विजय सुदाम तोडणकर (विजयी): ९१३ मते
सुरज सुरेश राणे: ६४१ मते
सिद्धी सिद्धेश कोसबे: ५३७ मते
(एकूण वैध मते: २११०)
सर्व ८ जागांवर आघाडीचा झेंडा
केवळ सरपंचच नाही, तर पोटनिवडणुकीत रिक्त असलेल्या सदस्य पदाच्या सर्वच्या सर्व जागांवर विकास आघाडीने विजय मिळवून राष्ट्रवादीला चारी मुंड्या चित केले आहे.
विजयी उमेदवार:
प्रभाग १: संकेत सुधाकर सोलकर (३५६), प्राप्ती निनाद रिळकर (३९५), शरयु हेमंत चोगले (३३६).
प्रभाग २: प्राजक्ता कुणाल भगत (३२३), सुहासिनी विजय पटवर्धन (२१६), प्रणव आनंद हावरे (१५७).
प्रभाग ३: सायली समिर भुसाणे (२४२), निखील प्रभाकर केळसकर (१७४).
न्यायालयीन लढा अन् राजकीय विजय
गणपती मंदिर ट्रस्ट आणि विकास सोसायटीच्या वादात विजय तोडणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात मिळवलेले यश या विजयाचा पाया ठरल्याचे बोलले जात आहे. या निकालामुळे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील आगामी राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुनील बबन पाटील यांनी या ऐतिहासिक विजयाची अधिकृत घोषणा केली.
