• Wed. Apr 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

स्वच्छतेबरोबर आरोग्याची ऐशीतैशी: घंटागाड्या दारात, तरीही कचरा रस्त्यावर!

ByEditor

Apr 29, 2026

कचराफेक्यांच्या बेजबाबदारपणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; कुंडलिका बचाव समिती व पर्यावरण प्रेमी संतप्त

धाटाव | शशिकांत मोरे
‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत गाव, वाड्या आणि शहरांमध्ये स्वच्छतेचा जागर केला जात असला, तरी प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच दिसत आहे. नगरपालिकेपासून ग्रामपंचायतीपर्यंत कचरा संकलनासाठी ‘घंटागाड्यांची’ व्यवस्था असूनही, समाजातील सुशिक्षित वर्गाकडूनच स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. धाटाव, रोहा आणि कोलाड परिसरातील रस्त्यांच्या कडेला आणि थेट नदीपात्रात कचरा फेकला जात असल्याने पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सुशिक्षितांचा ‘अशिक्षित’पणा; आलिशान गाड्यांमधून कचराफेक

सध्या रोहा-कोलाड रस्त्यावर रोठखुर्द गावाला लागून वाहणाऱ्या आंबा नदीत आणि रस्त्याच्या कडेला पहाटेच्या वेळी कचरा फेकण्याचे प्रमाण वाढले आहे. औद्योगिक वसाहतीत (MIDC) कामानिमित्त जाणारी सुशिक्षित माणसं आपल्या आलिशान गाड्यांमधून कचऱ्याच्या प्लास्टिक पिशव्या नदीवरील पुलावरून खाली भिरकावत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. मॉर्निंग वॉकिंगला जाणाऱ्या नागरिकांनी या बेजबाबदार लोकांना आता “कचराफेके” असे नाव ठेवले आहे.

नद्यांना डंपिंग ग्राउंडचे स्वरूप

रोठखुर्द पुलाजवळ टाकला जाणारा कचरा थेट आंबा आणि कुंडलिका नदीच्या पात्रात साचत आहे. ऑफिसच्या वेळा आणि घंटागाडीची वेळ जुळत नसल्याचे कारण देत अनेक नोकरदार घराबाहेर कचरा फेकण्याला पसंती देतात. कचऱ्याचे वर्गीकरण न करणे आणि मिश्र कचरा घंटागाडीने न स्वीकारल्यास तो उघड्यावर टाकणे, यामुळे परिसराला डंपिंग ग्राउंडचे स्वरूप आले आहे. यामुळे केवळ दुर्गंधीच पसरत नाही, तर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारख्या आजारांचा धोकाही वाढला आहे.

आता शब्दांचा नाही, फटाक्यांचा मार मिळणार!, तरुणांचा इशारा

केवळ नियम बनवून किंवा दंड आकारून हा प्रश्न सुटणारा नाही, तर नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. डिग्री हातात असूनही नागरी शिस्तीचा अभाव असणे ही चिंतेची बाब ठरत आहे. जर या ‘सुशिक्षित’ कचराफेक्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही, तर परिसरातील संतप्त तरुण वर्ग आता शब्दांनी नव्हे तर “फटाक्यांच्या माराने” (प्रसाद देऊन) धडा शिकवणार, अशा भावना व्यक्त होत आहेत.

“कुंडलिका नदी प्रदूषणमुक्त ठेवणे ही जशी शासनाची जबाबदारी आहे, तशीच ती नागरिकांचीही आहे. अनेकजण सोयीप्रमाणे घरगुती कचरा येता-जाता नदीपात्रात फेकून देतात. अशा ठिकाणी तातडीने सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावून कचरा टाकणाऱ्यांना रंगेहाथ पकडले पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.”
— दिलीप वडके
(सदस्य, कुंडलिका बचाव संघर्ष समिती, रोहा-रायगड)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!