• Wed. Apr 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

प्रशासनाला खासदार तटकरेंचा कडक इशारा; योजनांची १००% अंमलबजावणी करा!

ByEditor

Apr 29, 2026

‘कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष कामावर भर द्या’; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत

रायगड | अमुलकुमार जैन
केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची जिल्ह्यात शंभर टक्के आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असा कडक इशारा खासदार सुनील तटकरे यांनी दिला आहे. योजना राबवताना होणारी दिरंगाई, हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी संबंधित विभागांना कारवाईचा इशाराही दिला.

‘कागदी घोडे’ नाचवू नका; प्रत्यक्ष लाभ द्या

पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाले की, अनेक वेळा योजनांची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवले जाते; मात्र प्रत्यक्षात पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्याचे फायदे पोहोचत नाहीत. ही बाब अत्यंत गंभीर असून, “कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष काम” जमिनीवर दिसणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने काटेकोरपणे आणि संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे आहे.

पायाभूत सुविधा आणि कृषी क्षेत्रावर लक्ष

विकासकामांना गती देण्यासाठी सर्वच विभागांनी एकमेकांशी समन्वय राखून कार्य करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. योजनांच्या अंमलबजावणीत गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेचे नियोजन याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. विशेषतः प्रधानमंत्री ग्रामसडक योजना (रस्ते बांधणी), जल जीवन मिशन (पाणीपुरवठा), प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल), कृषी विभागाच्या विविध योजना या क्षेत्रांतील योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नियमित आढावा आणि कारवाई

शेतकऱ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती वाढवण्यावर तटकरे यांनी भर दिला. केवळ योजना जाहीर करून उपयोग नाही, तर त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्याला झाला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. योजनांच्या अंमलबजावणीचा आता नियमित आढावा घेतला जाणार असून, ज्या ठिकाणी त्रुटी किंवा जाणीवपूर्वक विलंब आढळेल, त्या प्रकरणांवर तातडीने कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खासदार तटकरे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्यातील सुस्त बसलेल्या यंत्रणेला आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!