पळसपचे सरपंचपद बिनविरोध; तर ७ ग्रामपंचायतींमध्ये उमेदवारांअभावी पदे रिक्त
माणगाव | सलीम शेख
राज्यातील ग्रामपंचायतींतील रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, माणगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींपैकी वणीमलईकोंड येथे झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेना (शिंदे गट) पुरस्कृत उमेदवार इर्शादअली सरखोत यांनी बाजी मारली आहे. तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली असून, काही ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्या आहेत, तर काही ठिकाणी एकही अर्ज न आल्याने पदे रिक्त राहिली आहेत.
वणीमलईकोंडमध्ये शिवसेनेचे वर्चस्व
वणीमलईकोंड ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. २ मधील रिक्त सदस्य पदासाठी मंगळवारी मतदान झाले. या निवडणुकीत इर्शादअली कमरुद्दीन सरखोत यांना १०२ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शौकतअली पोटे यांना ४९ मतांवर समाधान मानावे लागले. इर्शादअली सरखोत यांनी ५३ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. निवासी नायब तहसीलदार विपुल ढुमे आणि निवडणूक निर्णय अधिकारी बी. के. गोल्हार यांच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली.
पळसपचे सरपंचपद बिनविरोध
तालुक्यातील पळसप ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाची पोटनिवडणूक गावपातळीवर सामंजस्याने बिनविरोध करण्यात आली. या ठिकाणी वसंत बाबाजी कदम यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.
बिनविरोध निवडून आलेले सदस्य:
विविध ग्रामपंचायतींमध्ये एकूण ७ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत:
अंबर्ले: अनिता हरिश्चंद्र महाबळे
दहिवली तर्फे गोवेले: जहिदा दाऊद मापकर आणि झहिरा फैजल गालसूलकर
वडवली: निशा कीर्ती जाधव
गांगवली: समृद्धी शशिकांत मोरे
नांदवी: राजेश शंकर म्हाप्रळकर
गोवेले: गणेश लक्ष्मण गोविलकर
७ ग्रामपंचायतींमध्ये उमेदवारांचा दुष्काळ
एककीकडे राजकीय चुरस पाहायला मिळत असतानाच, तालुक्यातील टोळखूर्द (थेट सरपंचपद), काकल, पहेल, हरकोल, विहूले, कुमशेत, शिरवली तर्फे निजामपूर आणि देगाव या ७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. परिणामी, या ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि सदस्यांची पदे अद्यापही रिक्त राहिली आहेत.
