आदिवासी भागातील शैक्षणिक योगदानाची दखल; जिल्ह्यातील ‘टॉप ५’ शिक्षकांमध्ये समावेश
कोलाड | विश्वास निकम
रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा धानकान्हे आदिवासीवाडी येथील उपक्रमशील शिक्षिका शोभा अलंकार खांडेकर यांना ‘विनोबा ॲप ओपन लिंक फाउंडेशन’च्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘स्पर्धा प्रमाण’ विषयातील रायगड जिल्हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सोमवारी, २७ एप्रिल २०२६ रोजी एका विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा गौरव बहाल करण्यात आला.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा भोसले, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे आणि जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती दहितुले यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. शोभा खांडेकर यांची निवड जिल्ह्यातील ‘टॉप ५’ गुणवंत शिक्षकांमधून करण्यात आली आहे, हे विशेष.
२०२४ मध्ये शिक्षण सेवेत रुजू झालेल्या शोभा खांडेकर यांनी अत्यंत अल्प कालावधीत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासोबतच, विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद ठरले आहे. त्यांच्या या शैक्षणिक भरारीची आणि सामाजिक बांधिलकीची पोचपावती म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जात आहे. या यशाबद्दल त्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
