• Fri. May 1st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार प्रकरण : दोषींवर कारवाईसाठी शिवसेनेचे नगर परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण

ByEditor

May 1, 2026

श्रीवर्धन | अनिकेत मोहित
श्रीवर्धन शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन वारंवार फुटून निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. या योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, या संपूर्ण प्रकरणाची ‘एसीबी’ (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) मार्फत चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) वतीने आज श्रीवर्धन नगर परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

​शहरात गेल्या काही महिन्यांपासून पाईपलाईन फुटण्याचे सत्र सुरू आहे. यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत, यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

​विशेष सभेचे आश्वासन; आंदोलक भूमिकेवर ठाम

या आंदोलनाची दखल घेत श्रीवर्धन नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नवनियुक्त अभियंत्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. “येत्या ४ मे रोजी होणाऱ्या विशेष सभेमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्यात येईल,” असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र, जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला.

​मागण्या मान्य न झाल्यास भव्य मोर्चाचा इशारा

“शहरातील जनतेच्या जिव्हाळ्याचा असलेल्या या प्रश्नावर जर ४ मे च्या सभेत समाधानकारक निर्णय झाला नाही, तर श्रीवर्धन शहरात शिवसेनेच्या वतीने भव्य जनमोर्चा काढण्यात येईल,” असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

​आता ४ मे रोजी होणाऱ्या विशेष सभेत नगर परिषद प्रशासन काय भूमिका घेते आणि या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होते का, याकडे संपूर्ण श्रीवर्धन शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!