सलग सुट्ट्यांमुळे कोकण बहरले; कोलाड पोलिसांचे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
- एसटी बस, खासगी कार, रिक्षा आणि दुचाकींची मोठी गर्दी.
- खांब ते कोलाड दरम्यान वाहनांच्या ८ किमीपर्यंत रांगा.
- कोलाड पोलिसांकडून जागोजागी उभे राहून वाहतुकीचे नियोजन

कोलाड | विश्वास निकम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर पर्यटकांचा ओघ वाढल्याने आंबेवाडी आणि खांब बाजारपेठ परिसरात वाहतुकीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. शुक्रवार, १ मे (महाराष्ट्र दिन) आणि त्यानंतर शनिवार-रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने मुंबई, ठाणे, पुणे आणि देशाच्या विविध भागांतून लाखो पर्यटक कोकणाकडे रवाना झाले आहेत. मात्र, अपूर्ण रस्ते आणि उड्डाणपुलांच्या कामामुळे या प्रवाशांना ७ ते ८ किलोमीटर लांब रांगेत अडकून पडावे लागत आहे.
कोंडीचे मुख्य कारण: महामार्गाची अपूर्ण कामे
कोलाड आणि खांब परिसरात महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप प्रलंबित आहे. कोलाड येथे उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून पुलाच्या बाजूने असलेल्या सर्व्हिस रोडची दुरवस्था झाली आहे. तसेच खांब येथील पुलाचे कामही अपूर्ण असल्याने या अरुंद रस्त्यावरून वाहनांची वर्दळ हाताळणे कठीण होत आहे. उष्णतेचा पारा वाढल्याने नागरिक गारवा शोधण्यासाठी कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे निघाले आहेत, पण रस्त्यांवरील या ‘कोंडी’मुळे प्रवाशांच्या उत्साहावर विरजण पडत आहे.
पोलिस प्रशासनाची कसरत
वाहतूक कोंडीचा हा तिढा सोडवण्यासाठी कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) भारत फारणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आणि वाहतूक पोलीस भर उन्हात तैनात आहेत. वाहनांच्या रांगांमुळे निर्माण झालेली गुंतागुंत सोडवण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
“दरवेळी सुट्ट्यांच्या काळात या भागात तासनतास अडकून पडावे लागते. महामार्गाचे हे रखडलेले काम नेमके कधी पूर्ण होणार आणि आमची या त्रासातून कधी सुटका होणार?” असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
