पेण (प्रतिनिधी): दादर गावचे सुपुत्र आणि सुधागड एज्युकेशन सोसायटीचे निवृत्त प्राचार्य नारायण रामा पाटील (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे दादर गावासह संपूर्ण पेण तालुक्यात शोककळा पसरली असून, एका ध्येयनिष्ठ शिक्षकाचा प्रवास थांबल्याची भावना व्यक्त होत आहे.
नारायण पाटील ऊर्फ एन. आर. पाटील सर हे लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही त्यांनी जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले. पदवीधर झाल्यानंतर त्यांची नियुक्ती सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, दादर येथे झाली.
दादर हायस्कूलमध्ये त्यांनी सलग २५ वर्षे प्राचार्य म्हणून सेवा बजावली. केवळ विद्यार्थ्यांना घडवणेच नव्हे, तर शाळेच्या पायाभरणीपासून ते भव्य इमारत उभी करण्यापर्यंत त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. दादरमधील कार्यकाळानंतर त्यांची बदली अलिबाग येथील फोफेरी हायस्कूलमध्ये झाली. तिथे नऊ वर्षे यशस्वी सेवा देऊन २०२४ मध्येच ते सेवानिवृत्त झाले होते.
आपल्या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत पाटील सरांनी हजारो विद्यार्थी घडवले. अनेक तरुणांना त्यांनी रोजगारासाठी मार्गदर्शन करून स्वावलंबी बनवले. त्यांच्या निधनाने दादर गावाने एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व गमावले असल्याची हळहळ सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ, बहिणी आणि पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार, दिनांक ८ मे रोजी सकाळी ८ वाजता दादर खाडी येथे होणार असून उत्तरकार्य सोमवार, ११ मे रोजी दादर येथील राहत्या घरी होणार आहेत.
