उरण | विठ्ठल ममताबादे
मुंबई-गोवा महामार्ग आणि अटल सेतूच्या सानिध्यात असलेल्या उरण तालुक्यातील चिरले येथे बेकायदेशीरपणे डेब्रिज (बांधकाम कचरा) टाकणाऱ्या दोन डंपर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात अनधिकृतपणे कचरा टाकून पर्यावरणाचे नुकसान आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
भरारी पथकाची धाडसी कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास अटल सेतू जेथे संपतो, त्या चिरले परिसरात काही डंपर अनधिकृतपणे डेब्रिज टाकत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजीव कोलप यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार, सुरक्षा रक्षक आणि भरारी पथकाने तातडीने गस्त घालत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन डंपर प्रत्यक्ष डेब्रिज टाकत असताना रंगेहात पकडण्यात आले.
भरारी पथकाने कारवाई केलेले डंपर आणि चालकांची डंपर क्र. MH 01 EW 1486: चालक महेश बाबु कुंभार (वय ३१, रा. गोवंडी, मुंबई), डंपर क्र. MH 01 CB 8050: चालक शकीर सज्जद अली (वय २७, रा. वडाळा, मुंबई) अशी असून सुरक्षा जवानांच्या मदतीने हे दोन्ही डंपर ताब्यात घेऊन जासई पोलीस चौकी येथे आणून उभे करण्यात आले आहेत.
गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल
डेब्रिजची बेजबाबदारपणे विल्हेवाट लावून सिडको क्षेत्राचे विद्रुपीकरण करणे आणि सार्वजनिक आरोग्यास हानी पोहोचवल्याबद्दल चालकांवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ कलम २८०, ३(५), महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ कलम ३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२० अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सब इन्स्पेक्टर गोविंद दत्तात्रेय केंद्रे करीत आहेत.
कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी
अटल सेतूमुळे उरण परिसरातील कनेक्टिव्हिटी वाढली असली तरी, याच मार्गाचा वापर करून मुंबईतील डेब्रिज उरणच्या हद्दीत फेकण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनाने केवळ गुन्हे दाखल न करता, यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि सीसीटीव्ही गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
