• Thu. Apr 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये उंदरांचे ‘थैमान’, आरोग्य विभाग सुस्त; ‘निष्क्रिय’ अधिकार्‍याला ‘आदर्श पुरस्कार’ द्या!

ByEditor

Apr 30, 2026

उरण | घनश्याम कडू
उरण शहरात सध्या माणसं राहतात की उंदीर? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. शहरात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून उंदरांनी अक्षरशः आपले साम्राज्य उभारले आहे. या सर्व प्रकाराला नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा कारणीभूत असून, आरोग्य निरीक्षक हरेश तेजी यांच्या निष्क्रियतेबद्दल त्यांना उपरोधिकपणे “आदर्श पुरस्कार” द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

कचराकुंडी की उंदरांची ‘पोल्ट्री’?

शहरातील अनेक भागांत कचरा दिवसांनुदिवस उचलला जात नसल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दुर्गंधीने नागरिक हैराण झाले असून, उंदरांचे थवे उघड्यावर मुक्तपणे वावरताना दिसत आहेत. काही ठिकाणी परिस्थिती इतकी भयावह आहे की, कचराकुंड्या नसून जणू “उंदरांची पोल्ट्री”च सुरू आहे की काय, असा प्रश्न पडतो. कोटनाका येथील मासळी मार्केट परिसरात तर उंदरांनी अक्षरशः थैमान घातले असून, परिसरात संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

तक्रारदारांचे फोन ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये?

कामगार नेते संतोष पवार यांनी याप्रश्नी उपोषण करूनही प्रशासनाला जाग आलेली नाही. तक्रार करण्यासाठी नागरिक आरोग्य निरीक्षक हरेश तेजी यांना संपर्क साधतात, मात्र तक्रार निवारण्याऐवजी तक्रारदारांचे फोन चक्क ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकले जात असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. प्रशासनाच्या या बेफिकीरीमुळे उरणकरांच्या आरोग्याचा प्रश्न टांगणीला लागला आहे.

गेंड्याची कातडी आणि जनतेचा संताप

वृत्तपत्रांमधून वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही संबंधित अधिकारी ढिम्म हलण्यास तयार नाहीत. “गेंड्याच्या कातडीचे अधिकारी” अशी टीका आता उरणकर करत आहेत. आरोग्य निरीक्षकांनी पदभार स्वीकारल्यापासून शहराच्या स्वच्छतेचा स्तर खालावल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

आता प्रश्न एकच, उरणकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रशासकीय निष्क्रियतेला आळा कधी बसणार? की प्रशासन खरोखरच या ‘पोल्ट्री’साठी संबंधित अधिकाऱ्यांचा गौरव करणार? अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!