• Thu. Apr 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडमधील अंगणवाड्यांमध्ये आता घुमणार ‘A, B, C, D’…; जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय

ByEditor

Apr 30, 2026

अलिबाग | प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील अंगणवाड्या आता कात टाकणार असून, ग्रामीण भागातील चिमुरड्यांना मराठीसोबतच इंग्रजी भाषेचेही धडे मिळणार आहेत. पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे वाढणारा कल आणि मराठी शाळांची घटती पटसंख्या लक्षात घेता, रायगड जिल्हा परिषदेने अंगणवाडी स्तरापासूनच इंग्रजी भाषेची तोंडओळख करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

नाविन्यपूर्ण उपक्रमाचा श्रीगणेशा

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार १६१ अंगणवाड्या कार्यरत आहेत. या अंगणवाड्यांमध्ये बालकांना पोषण आहारासोबतच आता शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचे प्राथमिक शिक्षण दिले जाईल.

निवृत्त शिक्षकांचे मिळणार मार्गदर्शन

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, चिमुरड्यांसाठीचा इंग्रजी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी निवृत्त शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे. त्यांच्या अनुभवातून तयार झालेला सोपा आणि खेळकर अभ्यासक्रम अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवला जाईल.

पटसंख्या टिकवण्यासाठी पाऊल

खाजगी इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत सरकारी शाळा आणि अंगणवाड्यांची पटसंख्या कमी होत चालली आहे. ही गळती रोखण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मुलांना सुरुवातीपासूनच इंग्रजी भाषेची भीती वाटू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

“पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे ओढा वाढत असल्याने मराठी शाळांचा पट कमी होत आहे. हे टाळण्यासाठी अंगणवाड्यांमध्येच मुलांना इंग्रजीची तोंडओळख करून दिली जाणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम सर्व अंगणवाड्यांमध्ये प्रभावीपणे राबविला जाईल.”
— मधुकर पाटील, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!