• Sat. May 2nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणच्या कस्टम बॉण्डेड वेअरहाऊसमधून लाखोंच्या मालाची चोरी

ByEditor

May 2, 2026

विनायक नायडूसह त्याच्या साथीदारांचा शोध सुरू

उरण । विठ्ठल ममताबादे
उरण तालुक्यात अनेक ठिकाणी चोऱ्यांचे सत्र सुरु असून नुकताच एक चोरीची घटना समोर आली आहे.उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरात आयात झालेल्या व कस्टम विभागाने पुढील कारवाईसाठी भोम गाव येथील ‘सुयश लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘सुयश कमोडिटीज’च्या वेअरहाऊसमध्ये पुढील कारवाईसाठी ठेवलेल्या कंटेनरमधील तब्बल ७० लाख ३१ हजार रुपये किमतीच्या – मालाची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. उरण पोलिसांनी या चोरी प्रकरणात सहभागी असलेल्या विनायक नायडू आणि त्याच्या इतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

पियुष अग्रवाल (५३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ‘द प्रेमिसो’, ‘ध्रुवा इंटरनॅशनल’ आणि ‘एन. एम. शाह कॉर्पोरेशन’ या तीन कंपन्यांनी आयात केलेला माल कस्टम विभागाने तपासणीसाठी जप्त केला होता. हा माल ‘सुयश लॉजिस्टिक्स’च्या वेअरहाऊसमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र, १४ मे २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विनायक नायडू आणि त्याच्या इतर साथीदारांनी या वेअरहाऊसमध्ये प्रवेश करून या मालाची चोरी केली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

या चोरट्यांनी तीन वेगवेगळ्या ‘बिल ऑफ एण्ट्री’ नुसार या मालावर डल्ला मारला आहे, ज्यात प्रामुख्याने ट्रॉली, ब्रेसलेट, पोर्टेबल शिलाई मशीन, शूज व सॉक्स (५३,३५,००० रुपये), चिकटपट्टी, वेस्ट बॅग, सफाई संच, कॉफी कप, ब्रँडेड शूज (नायके, ऍडिडास, ऍसिक्स), अंडरगारमेंट आणि लहान मुलांच्या बॅगा (१०,२९,८९१ रुपये) व प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या, मुलांच्या स्कूल बॅग, चुंबक, पेन्सिल पाऊच (६,६६,४८६ रुपये) असा एकूण ७० लाख ३१ हजार रुपये किमतीचा माल चोरला आहे. उरण पोलीस ठाण्याचे व.पो.नि. हनिफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. अभिजीत देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत.उरण मध्ये चोरीच्या घटना वारंवार होत असून याला वेळीच लगाम बसविणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!