महाड | मिलिंद माने
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील वहूर गावाच्या हद्दीत शनिवारी सकाळी सहा वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. रस्त्यावर अचानक बैल आडवा आल्याने चालकाने ब्रेक मारला आणि मागून येणाऱ्या पाच गाड्या एकामागोमाग एकमेकांवर धडकल्या. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तीन वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
१ मेची सुट्टी आणि त्यानंतर लागून आलेले शनिवार-रविवारचे सुटीचे दिवस यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची महामार्गावर मोठी गर्दी होती. शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास वहूर गावच्या हद्दीतील पुलावर ही घटना घडली. कोकणच्या दिशेने जाणाऱ्या एका ‘ग्रँड विटारा’ कारसमोर अचानक बैल आला. बैलाला वाचवण्यासाठी चालकाने तातडीने ब्रेक लावला. मात्र, वेगवान वाहतुकीमुळे या कारच्या पाठीमागे असलेली पाच वाहने एकमेकांवर आदळली.
या साखळी अपघातात एकूण सहा वाहने बाधित झाली. यामध्ये ईरटीका (MH-05-EQ-7969), वॅगनआर (MH-02-DS-0569) आणि आणखी एका कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. ग्रँड विटारा, किया आणि अन्य एका कारला किरकोळ फटका बसला. सुदैवाने, सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यास मदत केली. महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
या अपघातामुळे महामार्गावरील मोकाट आणि पाळीव जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महामार्गावर जनावरांच्या मुक्त वावरमुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक दाबावे लागतात, ज्यामुळे असे जीवघेणे अपघात घडत आहेत. प्रशासनाने यावर कडक उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
