अलिबाग | अमुलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील आक्षी-साखर येथे मासेमारी बोटीवर काम करणाऱ्या एका ४३ वर्षीय खलाशाचा हृदयद्रावक अंत झाला. विरेंद्र रमाशंकर निषाद असे या मृताचे नाव असून, आपल्या सहकाऱ्यांसाठी प्रेमाने जेवण बनवून विश्रांतीसाठी झोपलेले विरेंद्र पुन्हा उठलेच नाहीत. मासेमारीचा हंगाम संपवून गावी जाण्याच्या तयारीत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिहिर नाखवा यांच्या ‘कृष्णाई’ बोटीवर विरेंद्र निषाद हे आपला मुलगा विकास आणि इतर सहकाऱ्यांसोबत कामाला होते. बोट मच्छीमारी आटोपून किनाऱ्यावर परतल्यानंतर सध्या बोटीवरील फाटलेली जाळी दुरुस्त करण्याचे काम सुरू होते. १ मे रोजी सकाळी विरेंद्र यांनी नेहमीप्रमाणे सर्व सहकाऱ्यांसाठी जेवण बनवले आणि त्यानंतर ते विश्रांतीसाठी बोटीवरच झोपले.
झोपेतच मृत्यूने गाठले
दुपारच्या सुमारास जेव्हा इतर कामगार जेवणासाठी विरेंद्र यांना उठवायला गेले, तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. सहकाऱ्यांनी त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना तातडीने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
गावी जाण्यापूर्वीच काळाचा घाला
मासेमारीचा हंगाम आता संपत आला असून विरेंद्र आपल्या मुलासह गावी जाण्याच्या तयारीत होते. घरातील कर्ता पुरुष आणि सोबतीला असलेल्या मुलासमोरच वडिलांचा असा मृत्यू झाल्याने निषाद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे आक्षी-साखर परिसरातील मच्छीमार बांधवांमध्ये शोककळा पसरली आहे.
याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
