श्रीवर्धन | अनिकेत मोहित
तालुक्यातील बोडणी येथे आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रेलरचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात काही जण जखमी झाले असून, एका कारचेही मोठे नुकसान झाले आहे. अजय भालचंद्र जाधव (वय २५, रा. काटकवडी, बागमांडला) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळंबोली येथील चालक तौफेल सलाउद्दीन अहमद हा आपल्या ताब्यातील ट्रेलर (क्रमांक MH 46 BB 4712) घेऊन जात असताना बोडणी येथे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याचा अंदाज न आल्याने हा ट्रेलर भरधाव वेगात घसरला आणि समोरून येणाऱ्या पिकअपवर (क्रमांक MH 06 G 9320) थेट पलटी झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रेलरच्या वजनाखाली पिकअपचा चक्काचूर झाला आणि चालक अजय जाधव यांचा जागीच अंत झाला.
कार चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

याच वेळी मागून येणाऱ्या कार (क्रमांक MH 02 DJ 9885) चालकाने समोर काळाचा घाला पाहून प्रसंगावधान राखले आणि आपली गाडी तातडीने रस्त्याखाली उतरवली. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, पलटी झालेल्या ट्रेलरमधील जड सामान कारवर कोसळल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने कारमधील प्रवासी सुरक्षित बचावले.
या अपघातातील अन्य जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच श्रीवर्धन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
