नागोठणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावी विज्ञान शाखेच्या निकालात भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस.डी. परमार इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजने घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९७.२२ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत सौमिली भुनिया हिने ८२.३३ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. ऋत्विक वुरीती याने ७९.३३ टक्के गुणांसह द्वितीय, तर देवांश लवटे याने ७७.०० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. यावर्षी विज्ञान शाखेतून एकूण ३६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व गुणवंतांचे मनापासून अभिनंदन केले आहे. कठीण परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासामुळेच हे यश मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
