म्हसळा | वैभव कळस
म्हसळा तालुक्यातील मेंदडी-खरसई हमरस्त्यावर रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यातील दुचाकी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या अपघातात पर्यटकांची कार रस्त्याबाहेर गेल्याने मोठी दुर्घटना घडता-घडता बचावली आहे.
पहिला भीषण अपघात मेंदडी येथील तीव्र वळणावर घडला. सुमन नामदेव शिवणे (वय ४२, रा. नानवली, श्रीवर्धन) या आपल्या भाच्यासोबत (शैलेश दामोदर हांडे, वय ३०) पल्सर दुचाकी (क्र. एमएच ५८ ए ८८१६) वरून वडवली येथून म्हसळा मार्गे मुंबईकडे जात होत्या. मेंदडी येथील वळणावर चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात सुमन शिवणे गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या धोकादायक वळणावर गेल्या पाच महिन्यांत पाच गंभीर अपघात झाले असून, प्रशासनाने येथे तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, दुसरा अपघात खरसई गावाजवळ घडला. पर्यटकांची एक भरधाव कार ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना अनियंत्रित होऊन थेट रस्त्याखालील शेतात शिरली. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दोन्ही घटनांची नोंद म्हसळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
