• Mon. May 4th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वयाला हरवून जिद्दीचा विजय! ज्येष्ठ पत्रकार सचिन देसाई वयाच्या ६०व्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण

ByEditor

May 4, 2026

माणगाव । सलीम शेख
“शिक्षणाला वयाचे बंधन नसते आणि जिद्द असेल तर कोणतेही शिखर सर करता येते,” हे माणगावचे ज्येष्ठ पत्रकार सचिन शरद देसाई यांनी सिद्ध करून दाखवले आहे. १९८४ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तब्बल ४२ वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर, देसाई यांनी वयाच्या साठाव्या वर्षी बारावीची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.

सचिन देसाई यांनी १९८४ मध्ये दहावीची परीक्षा पूर्ण केली होती. मात्र, तत्कालीन प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागले. कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी त्यांनी आय.टी.आय. करून रोजगाराचा मार्ग पत्करला. आयुष्याच्या धकाधकीत आणि पत्रकारितेच्या व्यापात अनेक दशके उलटली, तरीही शिक्षण अपूर्ण राहिल्याची रुखरुख त्यांच्या मनात कायम होती.

अखेर, वयाची साठी गाठलेली असताना त्यांनी आपली ही अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार केला. “वय झाले आता कशाला शिक्षण?” अशा विचारांना बाजूला सारून त्यांनी पुन्हा एकदा पुस्तके हाती घेतली. कुटुंबाचा खंबीर पाठिंबा आणि स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी २०२६ ची बारावीची परीक्षा दिली. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार, त्यांनी ४१ टक्के गुणांसह ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

सचिन देसाई यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून, ते शिक्षण अर्धवट सोडलेल्या अनेकांसाठी आशेचा किरण ठरले आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक तरुण अपयशाने खचून जातात, अशा वेळी देसाई यांच्या चिकाटीने सर्वांच्या नजरा उंचावल्या आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल माणगाव परिसरातून आणि पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘इच्छा असेल तर मार्ग दिसतोच’, हे देसाई यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!