• Mon. May 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली २७ लाखांचा गंडा; रेवदंडा परिसरात खळबळ

ByEditor

May 6, 2026

रेवदंडा | सचिन मयेकर
रायगड जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून, एका व्यक्तीला ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात ओढून तब्बल २७ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील एटीएस (ATS) अधिकारी बोलत असल्याचे सांगून आरोपींनी ही फसवणूक केली.

​मिळालेल्या माहितीनुसार, रेवदंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फिर्यादीला एका अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला. समोरच्या व्यक्तीने आपण लखनऊ (उत्तर प्रदेश) येथील एटीएस अधिकारी असल्याचे सांगितले. “तुमचा संबंध मनी लॉन्ड्रिंग व्यवसायाशी असून बेलगाव बॉम्बस्फोट प्रकरणात तुमचे नाव आले आहे,” असा खोटा आरोप आरोपींनी केला. अटक करणे, चौकशी आणि मीडियामध्ये बदनामी करण्याची धमकी दिल्याने फिर्यादी प्रचंड मानसिक दबावाखाली आला.

​आरोपींनी फिर्यादीला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सतत व्हिडिओ कॉलवर ठेवून त्यांच्या मालमत्तेची संपूर्ण माहिती काढून घेतली. त्यानंतर, “तुमच्या बँकेतील फिक्स डिपॉझिटचे पैसे ‘ब्लॅक की व्हाईट’ आहेत हे तपासायचे आहे, ते आम्हाला तातडीने पाठवा,” असे सांगून विश्वास संपादन केला.

घाबरलेल्या फिर्यादीने आपल्या आयुष्याची पुंजी असलेले फिक्स डिपॉझिट मोडले आणि घरातील दागिने विकून तब्बल २७ लाख रुपये जमा केले. ही रक्कम आरोपींनी दिलेल्या तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केली. पैसे मिळताच आरोपींनी संपर्क तोडला, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.

​याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१६(२), ३१८ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(c) व ६६(d) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस आता या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

​महत्त्वाची सूचना: कोणतीही शासकीय यंत्रणा व्हिडिओ कॉलवर कोणालाही ‘अरेस्ट’ करत नाही किंवा पैसे तपासणीसाठी मागत नाही. अशा कॉलला बळी पडू नका आणि तात्काळ १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधा.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!