श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन आगारातून मुंबईकडे निघालेल्या एसटी बसच्या साईड डिकीचा दरवाजा अचानक उघडल्याने रस्त्याने चालणाऱ्या तीन पादचाऱ्यांना जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दोन महिला व एका पुरुषाचा समावेश असून, तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बागमांडले येथे ही घटना घडली.
श्रीवर्धन आगाराची श्रीवर्धन-मुंबई बस (क्र. एमएच ०९ एफएल ०१६७) सायंकाळी ७ वाजता आगारातून रवाना झाली होती. बागमांडले परिसरात बस आली असता, वेगात असलेल्या बसच्या बाजूच्या डिकीचा दरवाजा अचानक उघडला आणि रस्त्याने चालत असलेल्या पादचाऱ्यांना जाऊन धडकला. ही धडक इतकी तीव्र होती की, काही जखमींच्या शरीराला बसच्या पत्र्याचा स्पर्श होऊन गंभीर जखमा झाल्या आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने बागमांडले येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच एसटी आगार प्रमुखांनी रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली.
या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी चालक आणि वाहकाच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अपघातावेळी दोघेही मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च एसटी प्रशासनाने करावा, अशी मागणीही स्थानिकांनी लावून धरली आहे.
श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, चालकाच्या वैद्यकीय तपासणीनंतरच मद्यप्राशनाबाबत अधिकृत माहिती समोर येईल. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
