अलिबाग (प्रतिनिधी): आर्थिक परिस्थिती बेताची असताना कर्करोगासारख्या मोठ्या आजाराचे निदान झाले की संपूर्ण कुटुंब कोलमडून पडते. मात्र, अशा कठीण प्रसंगात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मयूर चांदुरकर यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ ठरला आहे. शासनाच्या तात्काळ मदतीमुळे चांदुरकर यांनी रक्ताच्या कर्करोगावर यशस्वी मात केली असून ते आता सुखरूप घरी परतले आहेत.
महाड येथील ४२ वर्षीय मयूर चांदुरकर यांना गेल्या ९ ते १० वर्षांपासून किडनीचा त्रास होता. मात्र, अचानक वजन कमी होणे आणि अशक्तपणा वाढल्याने त्यांनी तपासणी केली असता, त्यांना रक्ताचा कर्करोग (Blood Cancer) असल्याचे निष्पन्न झाले. किरकोळ व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मयूर यांच्यावर वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांची जबाबदारी आहे. अशा वेळी उपचारासाठी लागणारा १५ ते १८ लाख रुपयांचा खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होता.
सोशल मीडियाच्या माध्यमातून चांदुरकर यांना मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल माहिती मिळाली. त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलच्या माध्यमातून मदत कक्षाकडे अर्ज केला. या प्रकरणाची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री सहायता निधीतून २ लाख रुपयांची मदत तात्काळ मंजूर करण्यात आली. तसेच टाटा ट्रस्ट आणि कक्षाच्या समन्वयातून टाटा ट्रस्टकडून १० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मिळवून देण्यात आले.
मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे चांदुरकर यांच्यावर वेळेत उपचार सुरू झाले. १६ एप्रिल २०२६ रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा होत आहे. या कठीण काळात मदतीचा हात मिळाल्याबद्दल चांदुरकर कुटुंबीयांनी मुख्यमंत्री आणि सहायता निधी कक्षाचे आभार मानले आहेत.
गरजूंनी संपर्क साधण्याचे आवाहन
राज्यातील कोणताही रुग्ण पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी हा कक्ष २४ तास कार्यरत आहे. गरजू रुग्णांनी मदतीसाठी 1800 123 2211 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
