म्हसळा । वैभव कळस
म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उद्या, गुरुवारी ७ मे रोजी निवडणूक पार पडणार असून या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दुपारी १२ वाजता विशेष सभेला सुरुवात होईल आणि मतदान प्रक्रियेनंतर तत्काळ निकाल घोषित केला जाणार आहे. या निवडीमुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला राजकीय पेच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
कार्यक्रमानुसार दुपारी १२.०५ वाजता उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल, तर १२.१० वाजता प्रत्यक्ष मतदान होऊन निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) कडून शाहिद जंजिरकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील शेडगे निवडणुकीच्या रिंगणात आमनेसामने आहेत.
या निवडीला विशेष राजकीय पार्श्वभूमी आहे. चार महिन्यांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्षांसह सहा नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने सत्तांतर झाले होते. मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सत्ता प्रस्थापित केली होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने या नगरसेवकांवर कारवाई करत त्यांची सदस्यता रद्द केली होती. दरम्यान, नगर विकास विभागाने या नगरसेवकांना पुन्हा पात्र ठरवल्याने राजकीय समीकरणे पुन्हा एकदा अत्यंत चुरशीची बनली आहेत.
सध्याच्या संख्याबळाचा विचार करता, म्हसळा नगरपंचायतीत शिवसेनेकडे १० नगरसेवकांचे पाठबळ आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ६ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील शेडगे यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी आपल्या नगरसेवकांना ‘व्हीप’ जारी केला आहे. दोन दिवसांपूर्वीच खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे की, पक्षाचा व्हीप मोडणाऱ्या बंडखोर नगरसेवकांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे आता शिवसेना आपल्या संख्याबळाच्या जोरावर नगराध्यक्षपद कायम राखणार की सुनील तटकरे यांच्या रणनीतीने राष्ट्रवादी काँग्रेस चमत्कार घडवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. रायगड जिल्ह्यातील हा हायव्होल्टेज सत्तासंघर्ष उद्याच्या निकालाने थांबणार की अधिक तीव्र होणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.
