माणगाव । सलीम शेख
माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभारामुळे गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत असून, या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य रणधीर महादेव कणोजे यांनी केला आहे. रुग्णालयाची ही दुरवस्था न सुधारल्यास सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना रणधीर कणोजे म्हणाले की, पूर्वी ४० खाटांचे कुटीर रुग्णालय असलेल्या या संस्थेचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाल्यानंतर नागरिकांच्या आशा उंचावल्या होत्या. या ठिकाणी गोरगरीब रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा मिळतील अशी अपेक्षा होती, मात्र सद्यस्थितीत हे रुग्णालय पूर्णपणे भकास झाले आहे. येथील सोनोग्राफी मशीन ऑपरेटरअभावी अनेक महिन्यांपासून धूळखात पडली आहे. खाजगी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी दोन हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते, जे आजच्या महागाईच्या काळात गोरगरीब जनतेला परवडणारे नाही.
याव्यतिरिक्त, रुग्णालयात तज्ज्ञ सर्जन डॉक्टर कायमस्वरूपी उपलब्ध नसल्याने बहुतांश रुग्णांना पुढील उपचारासाठी अलिबाग, मुंबई किंवा पनवेल या ठिकाणी धाव घ्यावी लागते. या परिस्थितीकडे लोकप्रतिनिधी आणि रुग्णालय व्यवस्थापन समितीने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. रुग्णालयातील या असुविधांमुळे रुग्णांचे होत असलेले हाल थांबले पाहिजेत आणि त्यांना योग्य सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. जर या समस्या त्वरित सुटल्या नाहीत, तर सर्वपक्षीय तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा कडक इशारा कणोजे यांनी दिला आहे.
