• Mon. May 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महावितरणच्या देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली नागोठणेकरांना भर उन्हात वेठीस धरले; बिल्डरच्या कामासाठी वीज बंद ठेवल्याची चर्चा रंगल्याने नागरिकांत संताप

ByEditor

May 6, 2026

नागोठणे | प्रतिनिधी
नागोठणे शहर आणि परिसरातील वीज पुरवठा मंगळवारी दिवसभर खंडित झाल्याने नागरिकांना भीषण उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. मुख्य वाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ही वीज कपात शहरातील एका बिल्डरच्या नवीन इमारतीमध्ये ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी करण्यात आल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू असल्याने महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

​महावितरणच्या नागोठणे उपविभागांतर्गत येणाऱ्या नागोठणे फिडरवर मंगळवारी ५ मे रोजी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. यामुळे नागोठणे शहरासह ऐनघर, सुकेळी, आमडोशी, वांगणी, वाकण, पाटणसई, चिकणी, वरवठणे, निडी, पळस, कोंडगाव, वासगाव, वेलशेत आणि कडसुरे या ग्रामीण भागातील वीज पुरवठा पूर्णपणे बंद होता. दिवसभर वीज नसल्यामुळे पाणी पुरवठा आणि दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला.

​दुरुस्तीचे कारण की खाजगी बिल्डरचे काम?

महावितरणने अधिकृतरीत्या ही वीज कपात तांत्रिक दुरुस्तीसाठी असल्याचे जाहीर केले होते. मात्र, नागोठणे शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या (बिल्डरच्या) इमारतीत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम करण्यासाठीच हा वीज पुरवठा बंद ठेवण्यात आल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये रंगली आहे. सध्या उन्हाचा पारा चढलेला असताना, तासनतास वीज नसल्याने लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींचे प्रचंड हाल झाले. केवळ एका खाजगी कामासाठी संपूर्ण परिसराला उन्हात होरपळत ठेवल्याचा आरोप करत नागरिकांनी महावितरणच्या या नियोजनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​सकाळी ९ पासून गेलेली वीज सायंकाळपर्यंत न आल्याने व्यापारी आणि घरगुती ग्राहकांचे मोठे नुकसान झाले. जर हे काम केवळ दुरुस्तीचे होते, तर त्या कामाची प्रगती काय? आणि जर हे काम एखाद्या बिल्डरसाठी होते, तर त्यासाठी संपूर्ण फिडर बंद ठेवण्याची गरज काय? असे प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून महावितरणने पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी नागोठणेकरांकडून होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!